गारगोटी : किशोरवयीन मुलींना देण्यात येणारा शासनाचा टी.एच.आर. आहार निकृष्ट दर्जाचा असून, हा आहार घरी नेल्यानंतर पालकांकडून जनावरांना घातला जात असल्याबाबत भुदरगडचे सभापती विलास कांबळे यांनी पंचायत समिती सभागृहात प्रश्न उपस्थित करून, तीव्र नाराजी व्यक्त केली. भुदरगड पंचायत समितीची चौथी मासिक सभा नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सभापती विलास कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. एस. टी. महामंडळ विभागाचा आढावा वाहन निरीक्षक ए. एन. देसाई यांनी सादर केला. शालेय विद्यार्थ्यांसाठी वासनोली-जोगेवाडी एस. टी. बस सुरू करावी व शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली गारगोटी-मेघोली एस. टी. बस बंद न करण्याची मागणी यशवंत नांदेकर यांनी केली, तर गारगोटी-गिरगाव बंद असणारी एस.टी. बस सुरू करण्याची मागणी शिवाजी देसाई यांनी केली. तालुक्यात उभारण्यात आलेले बस थांबा फलक लहान आकाराचे असल्याने ते चालकांच्या निदर्शनास तत्काळ येत नसल्याने विनंती बस थांबा ठिकाणी एस. टी. थांबत नाही. तरी हे फलक मोठ्या आकाराचे करावेत, अशी मागणी राजनंदा बेलेकर यांनी केली.सार्वजनिक बांधकाम विभाग गारगोटीचा आढावा कनिष्ठ अभियंता ए. ए. वायचळ यांनी सादर केला. रस्ते रुंदीकरण करतेवेळी संरक्षण कठडे बांधण्याबाबतची मागणी विश्वनाथ कुंभार यांनी केली. आजरा- काकवा देवी मार्गावर तीव्र वळण असून, या ठिकाणी संरक्षक भिंतीची उभारणी करावी, तसेच नितवडेजवळ असणारी मोरी दुरुस्त करावी, तसेच रेंज फॉरेस्ट विभागाचा आढावा ए. एस. पाटील यांनी सादर केला. एल.पी.जी. गॅस पुरविण्यासाठी जंगल क्षेत्राजवळील सर्वप्रथम चार गावांची निवड करून ती गावे पूर्ण करावीत. तसेच वन्य प्राण्यांसाठी जंगलामध्ये जास्तीतजास्त वनतळी उभारावीत, अशी सूचना विलास कांबळे यांनी केली. सी. डी. भोसले यांनी सामाजिक वनीकरण विभागाचा आढावा सादर केला. ज्या ठिकाणी ग्रामसेवक पदे रिक्त आहेत त्या ठिकाणची पदे त्वरित भरावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सभेस उपसभापती राजनंदा बेलेकर, पंचायत समिती सदस्य यशवंत नांदेकर, शिवाजी देसाई, विश्वनाथ कुंभार, विजयमाला चव्हाण, रतिपोर्णिमा कामत, गटविकास अधिकारी जी. आर. कांबळे, आदी उपस्थित होते. खतांचे दर कमी असताना शेती सेवा केंद्रांमार्फत जादा दराने खतांची विक्री सुरू असल्याचा पुरावा सभापती विलास कांबळे यांनी सभागृहात सादर केला. शेती सेवा केंद्र मनमनी दराने खते व बी-बियाणे विक्री करीत असून, गुणनियंत्रकाने महिन्यातून दोनवेळा शेती सेवा केंद्रांना व सेवा सोसायट्यांना भेट देऊन महाग दराने खते विक्री करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी विश्वनाथ कुंभार यांनी केली.
किशोरवयीन मुलींना निकृष्ट आहार
By admin | Published: July 15, 2016 9:20 PM