कोल्हापूर : चोरीच्या घटनात वाढ होत आहे, त्यात पतीपासून लपवून पैशाची बचत करण्याची काही महिलांना सवय असते. पण हे पैसे तिजोरीत अथवा डब्यात न ठेवता तांदळात, डाळीत अगर अडगळीच्या ठिकाणी ठेवले जातात. पण अशाच शनिवार पेठेतील एका महिलेने जमवलेली ७० हजारांची रोकड तांदळाच्या पिशवीत लपवून ठेवली. पण नंतर त्यांच्या ते लक्षात राहिले नाही अन् तिच पिशवी दारात आलेल्या भंगारवाल्या महिलेला देऊन टाकली. दोन दिवसांनी पैशाची आठवण झाली अन् सुरू झाली भंगारवाल्या महिलेची शोधाशोध. सुदैवाने त्याही महिलेने प्रामाणिकपणे पैसेही परत केले.
शनिवार पेठेत राहणाऱ्या महिलेकडे एक भंगार गोळा करणारी महिला आली होती. त्या महिलेला त्यांनी घरातील तांदळाने भरलेली पिशवी दिली. त्या भंगारवाल्या महिलेने घरी गेल्यानंतर पिशवी तशीच ठेवली. दोन दिवसांनी त्या पिशवीत आपण ७० हजाराच्या नोटा लपवून ठेवल्याची संबंधित महिलेला आठवण झाली. त्यांनी तातडीने लक्ष्मीपुरी पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार राजू संकपाळ, सिद्धेश्वर केदार, तानाजी दावणे, राहुल मोहिते यांनी त्या भंगार गोळा करणाऱ्या महिलेचा संपूर्ण शहरात शोध घेतला.
ती महिला सायबर चौक परिसरात आढळली. त्या महिलेनेही दोन दिवस ती तांदळाची पिशवीत उघडलीच नसल्याचे दिसून आले. तिने ती पिशवी सर्वांसमोर उघडून त्यातील ७० हजाराची रोकड प्रामाणिकपणे संबंधित महिलेला परत केली. पैसे मिळाल्याबद्दल संबंधित महिलेने पोलिसांचे व त्या भंगार गोळा करणाऱ्या महिलेचे आभार मानले.