शिवाजीराव लोंढेकसबा बीड : करवीर तालुक्यातील कसबा बीडमध्ये सोन्याच्या मुद्राबरोबरच अनेक पुरातन वस्तू, चांदीची नाणी, इंग्रजकालीन नाणी, वीरगळ सापडली आहेत. यातच दोन दिवसांपूर्वी बीड मधील अमोल बाळासो तिबिले यांना दुर्मिळ असे बहमनी कालीन नाणे सापडले. यामुळे दुर्मिळ खजिन्यात आणखी भर पडली. ग्रामस्थ अमोल बाळासो तिबिले यांची तुळसी घाट परिसरात शेतजमीन आहे. शेतात काम करताना त्यांना एक बहमनी कालीन नाणे सापडले. हे नाणे १.७ से.मी.चे असून त्याचे वजन ७.५ ग्रॅम इतके आहे. यावर अस्पष्ट अक्षरांचे अंकण दिसते.
कसबा बीड -महे दरम्यानचा पुल बांधण्याआधी या शेतातून आरे गावाला जाणारी पायवाट होती. या ठिकाणी आढळणारी नाणी पाहता ही वाट शिलाहार कालीन असून तिचा वापर इंग्रज काळापर्यंत होत असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते. 'यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी कसबा बीड' ही संघटना ऐतिहासिक ठेव्याचे जतन, संवर्धन व संशोधन करीत असते.
हे नाणे बहमनी सुत्तान शहाबुद्दीन महमदशहा तिसरा यांच्या काळातील आहे. १४६३ ते १४८२ ही त्यांची कारकीर्द होती. फार्सी भाषेतील हे नाणे असुन, पन्हाळ्याच्या परिसरात ही सापडतात. नईम शेख, नाणी अभ्यासक