कोल्हापूर : दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी अॅक्ट) अधिक कडक करावा, या मागणीसाठी बहुजनवादी पक्ष, संघटना आणि संस्थांतर्फे कोल्हापुरात प्रतिरोध मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या तयारीसाठी दि. ३० सप्टेंबरला मेळावा घेणार असल्याचे अॅट्रॉसिटी बचाव आणि मराठा आरक्षण समर्थनार्थ कृती समितीचे निमंत्रक अनिल म्हमाने व रिपब्लिकन पक्ष (गवई गट) जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वास देशमुख यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाजासह धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजासही आरक्षण देण्याची मागणी या मोर्चात व मेळाव्यात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अॅट्रॉसिटी कायदा आणि आरक्षणाबाबत बहुजनवादी पक्ष, संघटना, संस्थांची शाहू स्मारक भवनात बैठक झाली. या बैठकीतील निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. म्हमाने म्हणाले, कोपर्डीतील घटनेचा निषेध केला. कोपर्डीतील घटना आणि अॅट्रॉसिटीचा काहीही संबंध नाही, तरीही अॅट्रॉसिटी अॅक्ट रद्द करण्याची मागणी चुकीची आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. सन १९९४ पासून आंबेडकरी चळवळीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. आता सत्ता गेल्याने अस्वस्थ असलेले मराठा समाजातील काही बडे नेते गरीब मराठ्यांना घेऊन राजकारण करीत आहेत. जाती घट्ट करून दहशत निर्माण करण्याचा या नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे या दहशतवादाला उत्तर देण्यासाठी कोल्हापुरात बहुजनवादी पक्ष, संघटनांतर्फे प्रतिरोध मोर्चा काढण्यात येईल. त्याच्या तयारीसाठी ३० सप्टेंबरला दुपारी तीन वाजता दसरा चौकात बहुजनवादींचा व्यापक मेळावा होईल. प्रा. देशमुख म्हणाले, ‘मराठा आरक्षणाविरोधात हा प्रतिरोध मोर्चा नाही.’ यावेळी माजी आमदार राजीव आवळे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नंदकुमार गोंधळी, बहुजन ऐक्य चळवळीचे मच्ंिछद्र कांबळे, तसेच चंद्रकांत चौगुले, राहुल कांबळे, उमेश चांदणे, अस्मिता दिघे, अनंत मांडुकलीकर, सुनील पाटील, सुरेश सावर्डेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बहुजनवादी पक्ष, संघटना काढणार प्रतिरोध मोर्चा
By admin | Published: September 14, 2016 12:37 AM