कोल्हापूर : गुन्हेगार जमातीचा शिक्का मारलेल्या बेरड (बेडर-नाईक) समाजाच्या मुक्ती आणि सुधारणांसाठी गेली ४५ वर्षे कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि बेरडकार डॉ. भीमराव गस्ती (वय ७0) यांना गुरुवारी रात्री कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर न्यूमोनियाचे उपचार सुरु असून स्वाईन फ्ल्यूची शक्यता त्यांच्यावर उपचार करणाºया वैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केली आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती अद्याप स्थिर असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले आहे. स्वाईन फ्ल्यूसंदर्भातील अहवाल उद्या, शनिवारी मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
मंगळवारी डॉ. गस्ती यांना अस्वस्थ वाटल्याने त्यांना बेळगाव येथील केएलई सोसायटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु नंतर त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय त्यांच्या कुटूंबियांनी घेतला. त्यासाठी ते गुरुवारी सायंकाळी बेळगावहून पुण्याकडे जाण्यास निघाले. परंतु कोल्हापूरच्या पुढे वीस किलोमीटर आल्यानंतर त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर दोन वैद्यकीय अधिकारी उपचार करत असून त्यांना स्वाईन फ्ल्यूची शक्यता वाटते आहे. यासंदर्भातील अहवाल शनिवारी मिळेल, अशी माहिती रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने दिली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोल्हापूरातील स्वयंसेवकांशी डॉ. गस्ती यांनी तत्पूर्वी स्वत: संपर्क साधला. त्यानंतर स्वयंसेवकांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना याची माहिती दिली. त्यांनी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयाशी संपर्क साधून त्यांची तेथे दाखल करण्याची सोय केली. भारतीय जनता पक्षाचे महेश जाधव, विजय जाधव, मुकूंद भावे यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेवरुन डॉ. गस्ती यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. गस्ती यांच्यासोबत त्यांचे काका, मुलगा सुरेश आणि गावातील काही मंडळी आहेत.
देवदासी प्रथेविरुध्द सामाजिक प्रबोधन
डॉ. गस्ती मूळचे बेळगावजवळच्या यमनापूर येथील रहिवाशी आहेत. अंधश्रध्दा आणि रुढी- परंपरांनी जखडलेल्या बेडर समाजात जन्मलेल्या डॉ. गस्ती यांनी गावच्या शाळेतच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स ही पदव्युत्तर पदवी मिळवल्यावर रशियाची राजधानी मॉस्कोच्या पेट्रिक लुुमुंबा विद्यापीठातून याच विषयाची डॉक्टरेटही संपादन केली. हैद्राबाद येथील डी. आर. डी. ओ. मध्ये त्यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञाची नोकरीही मिळाली होती.
सुट्टीत गावी परतल्यावर बेळगावजवळच्या सुतकट्टी घाटात झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात, त्या परिसरातल्या बेरड समाजातल्या वीस निरपराध्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली. त्यांचा अनन्वित छळ केला. या अन्यायाने पेटून उठलेल्या गस्तींनी न्यायासाठी झुंज दिली. मोर्चे काढले, आंदोलने केली. या घटनेने त्यांचे जीवनच बदललले. त्यांनी बेरड समाजाच्या उन्नतीसाठी वाहून घेतले. निपाणीस त्यांनी १८० मुलींसाठी वसतीगृह सुरु केले. देवदासीच्या प्रथेचे निर्मूलन व्हावे यासाठी सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरु केली. शेकडो देवदासींचे विवाह केले. त्यांच्या २५ / ३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नामुळे देवदासींच्या मुली आता शिक्षण घेऊन शिक्षिका, प्राध्यापिका, तहसीलदार झालेल्या आहेत. ते अ.भा. बेरड रामोशी सेवा समितीचे अध्यक्ष आहेत.
साहित्यिक भीमराव गस्ती
डॉ. गस्ती यांनी सामाजिक कार्याबरोबरच विपुल लेखन सुद्धा केले आहे. सध्या ते साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आहेत. सामाजिक समरसता मंच प्रणित समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. बेरड समाजाच्या व्यथा, वेदना आणि होणाºया छळाचेच चित्रण करणारे बेरड हे त्यांचे आत्मचरित्र खूप प्रसिध्द आहे. याशिवाय आक्रोश, सांजवारा ही त्यांची आणखी काही पुस्तके प्रसिध्द आहेत.