कोल्हापूर : लहानवयातच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईच्या मदतीने मोठ्या कष्टाने स्वत:चे जीवन स्थिरस्थावर करेपर्यंत वाकरे (ता. करवीर) येथील बाजीराव पांडुरंग चौगले (वय ४८) यांच्यावर काळाने घाला घातला. शेतात फुले तोडत असताना सर्पदंश झाला आणि काय चावले हे कळेपर्यंत त्यांना मृत्यूने गाठले. सीपीआरमध्ये उपचार सुरू असतानाच रविवारी त्यांचा मृत्यू झाला.पुरते कळण्यापूर्वीच वडील गेल्यानंतर आई व आजींनी बाजीराव यांच्यासह तीन मुलींचा काबाडकष्ट करून सांभाळ केला. बाजीराव यांच्यावर लहानवयातच घरची जबाबदारी पडल्याने जीवनातील आनंद हरवला होता. तीन बहिणींची लग्ने केल्यानंतर स्वत:चा संसार स्थिरस्थावर करून आता कोठे सुखाचे चार दिवस आले होते, तोपर्यंत त्यांच्यावर काळाने असा दुर्दैवी घाला घातला. दूध व्यवसायाबरोबर फुलाची शेती असल्याने ते सकाळी लवकर फुले तोडण्यासाठी शेतात जात होते. गुरुवारी फुले तोडत असताना काहीतरी टोचल्यासारखे झाले. किडी किंवा तार टाेचली असेल म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत फुले तोडली. अस्वस्थ वाटू लागल्याने स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करून गोळ्या खाऊन ते झोपले. त्याच ठिकाणी ते बेशुद्ध पडले, सीपीआरमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांना मृत्यूने गाठले.
कष्टाने ‘फुल’वलेल्या संसाराला काळ‘सर्प’दृष्ट, वाकरेच्या बाजीराव लोंढेच्या मृत्यूने हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 3:29 PM