जिल्हा परिषदेत सत्तांतर, अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील, उपाध्यक्षपदी सतीश पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 03:22 PM2020-01-02T15:22:54+5:302020-01-02T15:40:05+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तांतर झाले असून अध्यक्षपदी अखेर अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे गगनबावडा तालुक्यातील सदस्य बजरंग पाटील यांची तर राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांची उपाध्यक्षपदी आज, गुरुवारी निवड झाली. शिवसेनेच्या सदस्यांनी दोन्ही काँग्रेसला पाठिंबा दिल्याने जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी सत्तेत आली आहे. राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न कोल्हापुरातही यशस्वी झाला. जिल्हापरिषेवर ३ वर्षांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकला.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेत सत्तांतर झाले असून अध्यक्षपदी अखेर अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे गगनबावडा तालुक्यातील सदस्य बजरंग पाटील यांची तर राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांची उपाध्यक्षपदी आज, गुरुवारी निवड झाली. शिवसेनेच्या सदस्यांनी दोन्ही काँग्रेसला पाठिंबा दिल्याने जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी सत्तेत आली आहे. राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न कोल्हापुरातही यशस्वी झाला. जिल्हापरिषेवर ३ वर्षांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकला.
बेळगाव येथे बुधवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीस बहुमतासाठी लागणारे ३४ सदस्य उपस्थित होते, आणि शिवसेनेने काँग्रेस महाआघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच आघाडी सत्तेत येणार हे निश्चित झाले होते. बजरंग पाटील हे मंत्री सतेज पाटील यांचे समर्थक आहेत.
जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये आज, गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून ही निवडप्रक्रिया सुरू झाली. करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर हे पीठासन अधिकारी होते. सकाळी ११ ते एक वाजेपर्यंत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. यानंतर २ वाजता सभेच्या प्रारंभी आलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला. त्यानंतर मतदान घेण्यात आले.
महाआघाडीचे उमेदवार बजरंग ज्ञानू पाटील उर्फ तात्या १७ मतांनी विजयी झाले. त्यांना ४१ मते मिळाली. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सतीश पाटील विजयी झाले. भाजप आघाडीचे उमेदवार अरुण इंगवले यांना अवघी २४ मते मिळाली. भाजपच्या विजय भोजे यांनी मतदान केले नाही तर राष्ट्रवादीचे जीवन पाटील गैरहजर राहिले. रेश्मा देसाई यांनी महाविकास आघाडीला मतदान केले, तर अंबरीश घाटगे यांनी भाजप विरोधात मतदान केले. राहुल पाटील अध्यक्ष पदाचे सूचक तर उमेश आपटे उपाध्यक्षपदाचे सूचक होते.
आमदार पी.एन.पाटील यांचे जिल्हा परिषदेतील समर्थक चार सदस्य काँग्रेससोबतच राहिले. त्यांना आमदार पाटील यांनी मंगळवारी माघारी बोलवून घेउन समजूत काढली होती.
बजरंग तात्या झेडपीत आल्यानंतर भावुक झाले, त्यांना अश्रू अनावर झाले, हे आनंदाचे अश्रू आहेत असे डोळे पुसतच म्हणाले.
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुक २०२०
पक्षीय बलाबल
- कॉग्रेस -१४
- राष्ट्रवादी -१०
- शिवसेना -१०
- शेतकरी संघटना -०२
- शाहू आघाडी _ ०२
- अपक्ष -०१
- चंदगड विकास आघाडी- ०१
- ताराराणी आघाडी - ०१
एकूण -४१
__
भाजप आघाडी
- भाजप -१३
- आवाडे गट -०२
- चंदगड युवक क्रांती आघाडी- ०१
- जनसुराज्य - ०६
- ताराराणी आघाडी ०२
एकूण -२४