बाजीराव जठार ।लोकमत न्यूज नेटवर्कवाघापूर : श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथे ६६ लाख रुपये खर्चाचे बाळूमामा यांचे वस्तूसंग्रहालय साकारत आहे. लवकरच हे संग्रहालय भाविकांसाठी खुले होणार आहे.श्रीक्षेत्र आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सद्गुरू बाळूमामांनी १९६६ साली आदमापूर येथे समाधी घेतली. एक आधुनिक संत म्हणून त्यांच्याकडे भाविक पाहतात. एक असाधारण संत असणाऱ्या बाळूमामांना प्रत्यक्ष पाहणारी, भेटणारी, बोलणारी बरीच मंडळी अजून हयात आहेत. या मंडळींकडून मामांची महती आजसुद्धा ऐकावयास मिळते. त्यामुळे या देवस्थानावर भक्तांची अपार श्रद्धा आहे. त्याचाच एक भाग म्हणून अशा संत बाळूमामा यांची कपडे, भांडीकुंडी, चपला, काठी, हत्यारे, भंडारा पिशवी, आदी साहित्य आज उपलब्ध आहे. याचबरोबर बाळूमामा भक्तांकडून अनेक मौल्यवान वस्तू देवस्थानला भेट दिल्या आहेत. यामध्ये पन्नास लाखांचा संपूर्ण सागवानी राजस्थान येथे तयार केलेला रथ, १३८ किलो वजनाची सुमारे ५४ लाख खर्चाची चांदीची बाळूमामांची मूर्ती, नाग मूर्ती, बकरा, घोडा, कुत्रा, अन्य प्राण्यांच्या मूर्ती येथे उपलब्ध आहेत. बाळूमामा यांच्या वापरातील या सर्व वस्तू एकाच छताखाली भक्तांना पाहता याव्यात यासाठी येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलशेजारी ६६ लाख खर्चाची इमारत उभी राहत आहे. या इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे भक्तांना या वस्तुसंग्रहालयाचा लाभ होणार आहे.
आदमापुरात साकारतेय बाळूमामांचे वस्तुसंग्रहालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:24 AM