कोल्हापूर : ‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर हे दूध उत्पादक व कर्मचाऱ्यांच्या हिताचे संचालकांनी घेतलेले निर्णय ऐकत नाहीत. ते केवळ महादेवराव महाडिक यांचे स्वीय सहायक राजन ऊर्फ बाळू शिंदे यांचेच ऐकतात, अशी टीका माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. सतेज पाटील म्हणाले, ‘गोकुळ’च्या भरभराटीत दूध उत्पादकांबरोबर कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. पण, कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांना वेळ नाही. संचालकांनी वेतनवाढीला मान्यता दिली असताना त्याची अंमलबजावणी न करता घाणेकर हे बाळू शिंदेच्या तालावर कारभार करीत आहेत. घाणेकर सेवानिवृत्त झाले तरीही त्यांना मुदताढ दिली आहे, ती कोणत्या नियमातून दिली आहे. घाणेकर यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रदूषण मंडळाने पाच लाखांचा दंड करत बॅँक डिपॉझीट जप्त केली, कर्मचाऱ्यांनी किरकोळ चूक केली, तर त्यांच्या पगारातून ती वसूल केली जाते. मग दूध उत्पादकांचे पाच लाखांचे नुकसान करणाऱ्या घाणेकर यांच्याकडून ते वसूल करावेत. घाणेकर यांच्याबरोबर आर. सी. शहा हे सेवानिवृत्त झाले आहेत, पण त्यांनाही नियमबाह्य मुदतवाढ दिली आहे. हे दोघे एकाच व्यक्तीचे ऐकतात म्हणून त्यांना अभय दिले जाते का? असा सवालही पाटील यांनी केला. संचालकांनी ठराव करूनही संघातील ‘सायलो’ प्रणालीची अंमलबजावणी का होत नाही. घाणेकर यांनी किती लाखांची नवीन गाडी घेतली, त्यांच्याकडे असे काय तंत्रज्ञान आहे, म्हणून त्यांना मुदतवाढ दिली. कोणाच्या हितासाठी त्यांना संरक्षण दिले जाते? असा सवाल करीत दूध उत्पादक व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी या दोघांना त्वरीत कार्यमुक्त करावे, अशी मागणी सतेज पाटील यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)
घाणेकर संचालकांपेक्षा बाळू शिंदेंचे ऐकतात
By admin | Published: February 01, 2015 12:57 AM