कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय परंपरा, इतिहासाचा मागोवा घेत जे चांगलं असेल ते स्वीकारत परिवर्तनासह राज्यघटनेतून समतोल साधत भारतीय समाजाला नवा दृष्टिकोन दिला, असे प्रतिपादन प्रा. डॉ. हरी नरके यांनी केले.राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन येथे बुधवारी आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार होते. यावेळी प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे उपस्थित होते.डॉ. नरके म्हणाले, बाबासाहेबांनी मनासारखी राज्यघटना लिहिली, असे मानणे अज्ञानाचे आहे. भारतीय संविधान निर्मिती प्रक्रियेबद्दल पुरेशी जागरूकता नाही, त्यामुळे अनेक अपरिचित पैलूंबद्दल गैरसमज आहेत. बाबासाहेब राज्यघटनेचे शिल्पकार असले तरी सर्वच गोष्टी त्यांना मनासारख्या आणता आल्या नाहीत, काही गोष्टी मनाविरुद्ध बहुमतामुळे आणाव्या लागल्या. घटना समितीच नको, ही बाबासाहेबांची भूमिका म्हणजे त्या समितीवर निवडून येणारी माणसे सामाजिक न्यायाची भूमिका घेतीलच, याची त्यांना शाश्वती नव्हती. महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी अनेक मुद्द्यांवर एकमत होते, हे वास्तव चळवळीतले कार्यकर्ते, शिक्षक नव्या पिढीला सांगत नाहीत. राज्यघटनेची मूळ चौकट बदलणे शक्य नाही. ती जगातील सर्वांत बलशाली लोकशाही व्यवस्थेचे प्रतीक आहे. अध्यक्षीय भाषणात डॉ. पवार म्हणाले, संशोधक वृत्तीने इतिहासाचा मागोवा घेत सत्याची मांडणी करीत राहिले पाहिजे. राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. विनोद कांबळे यांनी आभार मानले.आजचे व्याख्यान :दुष्काळ निवारण आणि जलनीतीवक्ते : या. रा. जाधव, ज्येष्ठ निवृत्त इंजिनिअर, नांदेडवेळ : सायंकाळी पाच वाजता
परिवर्तनाचा समतोल म्हणजे ‘राज्यघटना’
By admin | Published: June 23, 2016 1:00 AM