किल्ले सामानगडावरील बलभीम देवाची १२ ते १५ मार्चअखेर होणारी सात गावांची यात्रा कोरोनामुळे
रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार दिनेश पारगे यांनी दिली.
दरवर्षी, महाशिवरात्रीनंतर ही
यात्रा होते. यात्रेच्या आदल्या दिवशी सामानगडावर चिंचेवाडी, नौकूड, नूल, तनवडी, मुगळी, जरळी व भडगाव या गावांतील ग्रामदेवतांच्या पालख्यांची भेट होते. दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी साधेपणाने
पार पाडले जाणार आहेत.
दरवर्षी सात गावांतून येणाऱ्या पालख्या व त्यांच्या भेटीचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गडावर येतात; परंतु यावर्षी पालख्या वाहनातून गडावर येणार आहेत. प्रत्येक गावातील पालखीसोबत ६, धार्मिक विधीसाठी ५ आणि इतर ४ व्यक्ती अशा १५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतरासह सर्व नियमावलींचे संबंधितांनी काटेकोर पालन करावे. तसेच भाविकांनी यात्रा काळात दर्शनासाठी मंदिर परिसरात येऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.