कोल्हापूर : एका बंद पेटीतून माणूस गायब करणे, रंगीबेरंगी पिसांचा तिरंगा झेंडा होतो, डोळ्यांच्या शक्तीने पाहता पाहता टेबल उचलले जाते,.. अशा अनेकविध रंजक जादूंची सफर रविवारी बालचमूंनी अनुभवली. जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या ‘चला जादूच्या दुनियेत’ बालमंच सदस्यांनी मनसोक्त सफर केली. निमित्त होते जगप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या विशेष जादूच्या प्रयोगाचे.ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे ‘लोकमत बाल विकास मंच’च्या वतीने या विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सुट्टी आणि पावसाने दिलेल्या उघडीपीमुळे बालचमूंनी ड्रीम वर्ल्डमध्ये मोठी गर्दी केली होती.जगप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा प्रयोग पाहण्यासाठी बालमंच सदस्यांसह व पालकांनी मोठी गर्दी केली. त्यांच्या जादूच्या प्रयोगांनी बालमंच सदस्यांच्या मनावर एकप्रकारे गारुड केले आहे. त्यांच्या या जादूच्या मोहिनीमुळेच रविवारी फूल टू धमाल केली.
जितेंद्र रघुवीर यांनी प्रारंभी छोटे प्रयोग दाखवित खेळीमेळीचे वातावरण केले. सलमान खानच्या पोस्टरमधून बनियन गायब करून दाखविली आणि उपस्थितांना पोट धरून हसवले. एका रिकाम्या पाईपमधून विविध गोष्टी काढून दाखवित प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. काही प्रेक्षकांना मंचावर बोलावून त्यांनी काही प्रश्न विचारले, त्यांनी दिलेली उत्तरे फळ्यावर लिहिण्यात आली आणि क्षणार्धात त्यांनी दिलेली उत्तरं लिहिलेली चिठ्ठी एका कुलूपबंद बॉक्समधून काढून दाखविली. त्यांच्या मनातल्या गोष्टी ओळखून जितेंद्र रघुवीर यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या प्रयोगाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.त्याचबरोबर धारदार वस्तूवरून सोडल्यानंतरही न कापली जाणारी मान. रिकाम्या बॉक्समधून बाहेर निघालेला माणूस, केवळ कापडाला धरून हवेत उडवलेले टेबल हे सर्व जादूचे प्रयोग पाहताना प्रेक्षक थक्क झाले होते, खेळण्याच्या तीन पत्त्यांमधून काढलेले अनेक पत्ते, मासिकात पाणी ओतून ते परत ग्लासमध्ये काढून दाखविणे असे हातचलाखीचे नमुने सादर केले. प्रेक्षकांना सहभागी करून घेत हिऱ्यांची अंगठी गायब करून पुन्हा वेगळ्या जागी शोधून दाखविली.नावीन्यपूर्ण प्रयोग सादर करून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली; पण विविध प्रकारच्या जादंूचे प्रयोग पाहून उपस्थित बालचमंूचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आपल्या जादूच्या प्रयोगांमध्ये प्रेक्षकांनाही सामावून घेतले. त्यांच्या सोबतही काही प्रयोग करून दाखविण्यात आले.एका जागी खिळून बसली मुलेसंगणक आणि मोबाईलच्या जमान्यात एका जागी या दोन वस्तूंपासून बाजूला मुले स्थिर बसणे तसे कठीण, तरीही सुमारे तीन तास एका जागी बसून हे प्रयोग प्रत्यक्ष स्टेजवर पाहत होती. तेव्हाच खरेतर यशाची पावती मिळाली.जादूच्या छोट्या छोट्या क्लृप्त्या...जितेंद्र रघुवीर यांनी जादूच्या छोट्या छोट्या क्लृप्त्याही उपस्थितांना समजावून सांगितल्या. एका पत्त्याची काडेपेटी कशी होते, दोरखंड आडवा एका रेषेत स्थिर राहतो, पत्त्यांचा रंग बदलतो, पत्त्यांआधारे समोरच्या माणसाचे वय कसे ओळखावे, रंगीत फुले कशी काढायची, अशा अनेक जादुई कला त्यांनी लहानग्यांना शिकविल्या.
नोंदणी अद्याप सुरु..‘लोकमत बाल विकास मंच’ २०१९ -२०च्या सदस्यांसाठी नवीन नोंदणी सुरू आहे. अवघे काही दिवस शिल्लक आहेत, तरी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी लोकमत शहर कार्यालय, पूर्णिमा अपार्टमेंट, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथे संपर्क साधावा.