- उद्धव गोडसेकोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथे कात्यायनी ज्वेलर्सवर गुरुवारी (दि. ८) भरदुपारी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे सव्वातीन किलो वजनाचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील मुख्य सूत्रधारांसह दोघांना पोलिसांनी शुक्रवारी (दि. ९) कोपार्डे (ता. करवीर) येथून पकडले. स्पर्धक सराफ सतीश सखाराम पोहाळकर (वय ३७, रा. कणेरकर नगर, फुलेवाडी, कोल्हापूर) आणि विशाल धनाजी वरेकर (वय ३२, सध्या रा. कोपार्डे, मूळ रा. वाकरे, ता. करवीर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दरोड्यातील ३६७ ग्रॅम वजनाचे दागिने, दोन दुचाकी आणि एक कार असा सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
दरोड्यात चार परप्रांतीयांसह एकूण सात जणांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार परप्रांतीय दरोडेखोरांच्या अटकेसाठी पथके रवाना झाली असून, लवकरच अन्य दरोडेखोरांसह उर्वरित मुद्देमाल जप्त केला जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शनिवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत दिली.
अधीक्षक पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी पोहाळकर हा सराफ व्यावसायिक आहे. त्याचे अंबिका ज्वेलर्स नावाचे दुकान २०११ ते २०२१ या काळात बालिंगा येथे कात्यायनी ज्वेलर्सच्या समोरच होते. व्यवसायात नुकसान झाल्याने त्याने रंकाळा बस स्टँडजवळ दुकानाचे स्थलांतर केले. गेल्या वर्षी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याची कळंबा कारागृहात रवानगी झाली होती. त्याच ठिकाणी त्याची काही परप्रांतीय गुन्हेगारांशी ओळख झाली. मार्च २०२३ मध्ये कारागृहातून सुटल्यानंतरही पोहाळकर गुन्हेगारांच्या संपर्कात होता. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी कात्यायनी ज्वेलर्स लुटण्याचा कट रचला. त्यानुसार चार परप्रांतीय गुन्हेगार पिस्तूल घेऊन विशाल वरेकर याच्या घरी आले. त्यांनी तीन ते पाच जून दरम्यान कात्यायनी ज्वेलर्सची रेकी केली. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास दरोडा टाकून यांनी सुमारे सव्वातीन किलो वजनाचे दोन कोटी सहा लाख ८४ हजार ८५० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.
३६ तासांत आरोपी जेरबंदउपलब्ध सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांचे नंबर आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना संशयितांचा सुगावा लागला. गुन्हा घडल्यापासून ३६ तासांत वरेकर आणि पोहाळकर या दोघांनाही पोलिसांनी वरेकर याच्या घरातून अटक केली. वरेकर याच्या वाटणीला आलेले ३६७ ग्रॅम सोने पोलिसांच्या हाती लागले. गुन्ह्यात आणखी एका स्थानिक संशयिताचा समावेश असून, त्याचा शोध सुरू असल्याचे अधीक्षक पंडित यांनी सांगितले.
मोठा हात मारण्याचा डावकात्यायनी ज्वेलर्सशी कराव्या लागलेल्या स्पर्धेतून व्यवसायात आलेले अपयश आणि मोठा हात मारण्याच्या उद्देशाने पोहाळकर याने परप्रांतीय गुन्हेगार आणि स्थानिक दोन साथीदारांना सोबत घेऊन दरोड्याचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले.