सातारा : पाणी भरपूर आहे म्हणून कसेही वापराल का? वीज जपून वापरली तर पर्यावरणाचे संवर्धन आपोआप होते, हे तुम्हाला माहीत आहे का? शरीराची स्वच्छता राखण्याची तुमची पद्धत योग्य आहे का? लहानगी मुलेही रानावनात जाऊन संशोधन करीत आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का? अशा अनेक ‘का’ची उत्तरं लहानथोरांना मिळतील ‘सीईई’च्या फिरत्या प्रदर्शनाद्वारे. गुलमोहर दिनाचे औचित्य साधून या स्वयंसेवी संस्थेची भलीमोठी बस शुक्रवारी दाखल होतेय साताऱ्यात!सेंटर फॉर एन्व्हायर्नमेन्ट एज्युकेशन (सीईई) ही पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारी एक नामांकित स्वयंसेवी संस्था आहे. गेल्या तीन वर्षांपासून संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. जैवविविधतेची माहिती करून देण्यासाठी संस्थेने एक मोठी बस त्यासाठी तैनात केली आहे. महाराष्ट्रातील जैवविविधतेची माहिती देण्याबरोबरच पर्यावरण शिक्षणाचे काम कार्यकर्त्यांचा फिरता चमू करीत आहे.सातारची ओळख बनून गेलेल्या आगळ्यावेगळ्या गुलमोहर दिनाच्या निमित्ताने पर्यावरण रक्षणाचा जागर दरवर्षी होतो, याची माहिती मिळाल्यावर ‘सीईई’ने ही बस शुक्रवारी कार्यक्रमस्थळी पूर्णवेळ म्हणजे सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत उभी करण्याचा निर्णय घेतला. या बसमध्ये छायाचित्रे, लिखित माहिती आणि मॉडेल्सचा वापर केला जातो. या बसमधून योजना अधिकारी राजश्री इंझामुरी, एस. पी. पाटील, स्वप्नील हेरवाडे आणि भीमाशंकर ढाले हे चौघे साताऱ्यात येत आहेत. (प्रतिनिधी)शाळकरी मुले बनली संशोधक‘सीईई’च्या प्रकल्पाद्वारे शाळकरी मुलांनी पर्यावरण क्षेत्रात रस घेऊन संशोधन सुरू केले आहे. शाळांमधून पर्यावरण जागृती करताना संस्थेला हे बाल संशोधक मिळाले. या मुलांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये फिरून संशोधन केले आहे. माहिती आणि बियांचे संकलन केले आहे. देशी वाणांची परंपरा खंडित होता कामा नये, यासाठी मुलांनी आंबा, जांभूळ, फणस, करवंद अशा सह्याद्रीतील वृक्षसंपदेच्या देशी वाणांवर संशोधन सुरू ठेवले आहे.
बालमित्रांनो.. जाणून घ्या तुमचा भोवताल!
By admin | Published: April 30, 2015 11:18 PM