कोल्हापूर : ‘श्रमिक व कष्टकऱ्यांची वस्ती’ अशी ओळख असणाऱ्या लक्षतीर्थ वसाहतीमध्ये कलाभूषण मंडळाच्या कार्यकर्त्यंानी बालमित्रांसाठी ग्रंथालय सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन नववर्षाच्या मुहूर्तावर झाले. वसाहतीसह परिसरातील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. जनजागृती आणि सामाजिक प्रबोधनासाठी उचललेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.नेहमीच विधायक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या कलाभूषण तरुण मंडळप्रणीत रिलॅक्स बॉईजतर्फे यंदाही एक उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात येत आहे. मंडळाच्या २५ व्या वर्षाच्या पदार्पणानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची आवड व्हावी, या उद्देशाने मोफत बालमित्र ग्रंथालय सुरू केले आहे. लक्षतीर्थ शेवटचा बसस्टॉपशेजारील रेडेकर गल्लीतील एका घरात हे ग्रंथालय सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन सुधीर गौरांग दास प्रभुजी, प्रशांत प्रभुजी हस्ते झाले यावेळी नगरसेवक सचिन खेडकर, सोनाळीचे सरपंच सत्यजित जाधव, नगरसेविका मीना सूर्यवंशी, माजी नगरसेवक नंदकुमार सूर्यवंशी, अण्णा पडळकर, परशुराम रेडेकर, संभाजी शिंदे, जयवंतराव अतिगे्र, राजकुमार रेडेकर, रंगराव पाटील, प्रकाश पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.मोफत ग्रंथालयासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लोकवर्गणी गोळा करून जमलेल्या वर्गणीतून साडेतीनशे पुस्तके खरेदी केली. मनोरंजनासह बोधकथा, गोष्टी, प्रकल्प पुस्तके, खेळ, जनरल नॉलेज बालसाहित्य अशा पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे. आतापर्यंत ग्रंथालयाचे सव्वाशे सभासद झाले आहेत. यासाठी कोणतेही शुल्क न घेता ही नोंदणी करण्यात आली आहे. लवकरच सभासदांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. आठवड्यातून एकदा हे पुस्तक वाचून झाल्यावर ग्रंथालयातून परत बदलून मिळतील. या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष रोहन रेडेकर, उपाध्यक्ष इंद्रजित महेकर, मनोज गडदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत. (प्रतिनिधी)
बालमित्रांना मिळाली ग्रंथालयाची भेट
By admin | Published: January 05, 2015 12:11 AM