लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एकाच बॉक्समधून अनेक वस्तू, शून्यातून विश्वाची निर्मिती, अरेबिक जादू, पत्त्यांचे प्रयोग अशा देशी व विदेशी जादूंचे प्रयोग सादर करून जादूच्या प्रयोगांचे धडे रविवारी बालमित्रांनी गिरविले. निमित्त होते ‘लोकमत बाल विकास मंच’तर्फे जादूच्या प्रयोगांची आणि कार्यशाळा. त्यात जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी बालमित्रांना जादू शिकविली.राजारामपुरीतील व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात झालेल्या या विशेष प्रयोग व कार्यशाळेचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. भारत खराटे, डॉट अॅन्ड टॉटस् स्कूलच्या प्रिन्सीपल नीशा अरोरा व जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या हस्ते करण्यात आले. या विशेष शोचे प्रायोजक चाटे शिक्षण समूह हे होते.जादूचे प्रयोग सुरू होताच बालचमूंनी एकच जल्लोष करून जादूगार जितेंद्र रघुवीर यांचे स्वागत केले. जितेंद्र रघुवीर यांनीही स्पेशल लाईट इफेक्टच्या माध्यमातून दमदार एंट्री करून उपस्थितांना प्रारंभीच तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले. त्यानंतर जादूगार जितेंद्र यांनी आपल्या जादूंच्या प्रयोगास सुरुवात केली. डबल एक्स्चेंज मिस्ट्री, रूबिक्स क्यूब गेम शो, मास्टर आॅफ प्रेडिक्शन, एकाच बॉक्समधून अनेक वस्तू, गिलोटोन हा जिवंत माणसाचा मान कापणारा खेळ पाहून लहानांसोबत पालकांचा थरकाप उडाला.जादूच्या प्रयोगानंतर ते बालमित्रांना त्याची क्लृप्ती (ट्रिक्स) समजावून सांगत होते. ज्यांना ती क्लृप्ती समजत नव्हती, अशा मुला-मुलींमध्ये जाऊन तसेच काहीजणांना व्यासपीठावर बोलावून ती क्लृप्ती ते परत दाखवत होते. दीड तासांच्या कार्यक्रमात बालमित्रांना समजेल अशा पद्धतीने जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी शिकवलेले प्रयोग, क्लृप्त्या उपस्थित मुला-मुलींनी वहीमध्ये लिहून घेतल्या. इतक्या सहजपणे जादूचे प्रयोग करता येतात, हेपाहून बालमित्रही भारावून गेले.अखेरची संधी....‘लोकमत बाल विकास मंच’चे सबस्क्रिप्शन होण्याचा आज, सोमवारी अखेरचा दिवस आहे. प्ले गु्रप ते दहावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी लोकमत बाल विकास मंचसाठी सबस्क्रिप्शन करू शकतात. अधिक माहिती व सबस्क्रिप्शनसाठी ‘लोकमत’ शहर कार्यालय - ०२३१ / २६४१७०७,०८ येथे संपर्क साधावा.स्मृतिभवन हाऊसफुल्लजादूचे प्रयोग पाहणे हा आबालवृद्धांसाठी मनोरंजन व आनंददायी अनुभव असतो. अनेक लहान मुलांना या प्रयोगांबाबत उत्सुकता असते शिवाय त्यांना ते शिकण्याचीही इच्छा असते. ते लक्षात घेऊन जादूचे प्रयोग आणि जादूचे प्रयोग शिकण्याची संधी ‘लोकमत बाल विकास मंच’ने बालमित्रांना उपलब्ध करून दिल्याने याला बालचमूंसह पालकांनी मोठी गर्दी केली होती. अवघ्या काही मिनिटांतच स्मृतिभवन हाऊसफुल्ल झाले होते.
बालमित्रांनी गिरविले जादूचे ‘धडे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:37 AM