कोल्हापूर : छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या केएसए फुटबॉल लीग सामन्यात बुधवारी झालेल्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने शिवाजी तरुण मंडळावर ३-० गोलफरकाने मात केली, तर पॅट्रीयट स्पोर्टस्ने प्रॅक्टिस ‘ब’ वर १-० गोलफरकाने मात करीत विजय मिळविला. पहिला सामना पॅट्रीयट स्पोर्टस् विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘ब’ यांच्यामध्ये खेळविण्यात आला. सामन्याच्या प्रारंभी दोन्ही संघांनी बचावात्मक खेळी केल्याने मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य फरकाने बरोबरीत होता. उत्तरार्धात पॅट्रीयटकडून भारत लोकरे, रौनक कांबळे, मुसद मुल्ला, इंद्रजित पाटील यांनी, तर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘ब’ कडून प्रसन्नजित यादव, आशितोष मंडलिक, अनिकेत जोशी, सौरभ हारुगडे यांनी खाते उघडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. यामध्ये ७८व्या मिनिटाला पॅट्रीयटच्या अजिंक्य पाटीलने गोल नोंदवीत सामन्यात १-० गोलची आघाडी घेतली. ही आघाडी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली. दुसरा सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यामध्ये झाला. सामन्याच्या प्रारंभापासूनच बालगोपाल तालीम मंडळाने सामन्यावर पकड निर्माण केली होती. सामन्याच्या आठव्या मिनिटाला बालगोपाल तालीम मंडळाच्या सूरज जाधवने गोल नोंदवीत सामन्यात संघाचे खाते उघडले. ३०व्या मिनिटाला सचिन गायकवाडने गोल नोंदवीत सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. ३३व्या मिनिटाला रोहित कुरणेने गोल नोंदवत सामन्यात ३-० अशी भक्कम आघाडी घेतली. ही आघाडी मध्यंतरापर्यंत कायम राहिली. उत्तरार्धात शिवाजी तरुण मंडळाकडून शिवतेज खराडे, विकी सुतार, श्रीधर परब, कुणाल जाधव यांनी ही आघाडी कमी करण्यासाठी पराकाष्ठा केली, मात्र त्यांना अपयश आले, तर बालगोपाल तालीम मंडळाकडून आकाश भोसले, ऋतुराज पाटील, आशिष कुरणे, अजित पवार यांनी ही आघाडी अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्न केले. सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने ३-०ने विजय मिळविला.
‘बालगोपाल’ची ‘शिवाजी’वर मात
By admin | Published: January 07, 2016 12:18 AM