वाघापूर : श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव रविवार (दि. १२) मार्च ते सोमवार (दि. २०) मार्चअखेर संपन्न होत आहे. भंडारा उत्सव यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, सचिव रावसाहेब कोणकेरी यांनी दिली.रविवार (दि. १२) मार्च रोजी सायंकाळी सात वाजता विणा पूजनाने यात्रेस प्रारंभ होईल. समाधी पूजन, काकडा आरती, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, हरी जागर अशा कार्यक्रमांचे आयोजन प्रतिदिन करण्यात आले आहे. शनिवार (दि. १८) मार्च रोजी श्रींचा जागर, रविवार (दि. १९) रोजी कृष्णात डोणे- वाघापूरकर यांचा भाकणुकीचा कार्यक्रम व काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद, सोमवार (दि. २०) रोजी दिवसभर पालखी सोहळा होणार आहे.या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बाळूमामा देवालय समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी बाजार समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील, गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे, यशवंतराव पाटील, शामराव होडगे, यात्रा कमिटी सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कणसे, व्यवस्थापक अशोक पाटील आदी उपस्थित होते.
आदमापूर येथे रविवारपासून बाळूमामांचा भंडारा, यात्रेचे मुख्य दिवस कधी..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 12:19 PM