राजीव मुळ्ये ल्ल सातारा मिनरल वॉटरच्या बाटल्या म्हणजे पर्यावरणाला धोका उत्पन्न करणारा घातक कचरा, एवढीच गोष्ट आपण जाणतो. मात्र, त्याच बाटल्यांचा उपयोग करून घर बांधलं तर...? बांधकामापासूनच असे प्रयोग करून कºहाडच्या मानवेंद्रनाथ रॉय अनौपचारिक शिक्षण आणि संशोधन संस्थेनं कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ले-आंबा या ठिकाणी खरंखुरं निसर्गपर्यटन विकसित केलंय. तेही स्थानिकांच्या मालकीचं. स्थानिक संस्कृतीच्या जोपासनेबरोबरच विज्ञानातील प्रयोग करण्यासाठी खुली प्रयोगशाळा संस्थेनं सुरू केली असून, पहिली ते पीएच.डी. पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिथं प्रयोग करण्याची पूर्ण मुभा आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांची भिंत ही संकल्पना ऐकताना पटणारी नाही. परंतु, असे अनेक प्रयोग जगदीशचंद्र बोस विज्ञान आश्रम या नावानं उभारलेल्या केंद्रात संस्थेनं केले आहेत. डॉ. राजेंद्र कुंभार हे या प्रयत्नांचे प्रणेते असून, संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बिनपायाच्या इमारतीची संकल्पनाही सत्यात उतरविली आहे. निसर्गपर्यटनाच्या रूढ कल्पनांना संस्थेनं छेद दिलाय. स्थानिक लोकसंस्कृती अजिबात विस्कळीत होऊ न देता हे पर्यटनकेंद्र उभारण्यात आलंय. शिवाय स्थानिकांनाच भागीदार करून घेतल्यामुळं पर्यटनाचा आर्थिक लाभ खर्या अर्थानं लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. इथं पर्यटकांना पंजाबी डिशेस, साउथ इंडियन डिशेस मिळू शकणार नाहीत. मात्र, स्थानिक पदार्थांची चवच त्यांना भुरळ घालेल. पर्यटकांना आणण्याची जबाबदारी संस्थेची असली, तरी पुढील व्यवस्थापन ग्रामस्थांनी करायचं आहे. गजा नृत्य, जाखडी नृत्य, टिपरी नृत्य, भेदिक शाहिरी अशा लोककलांचा रसरशीतपणा पर्यटकांनी अनुभवायचाय. संस्थेनं सध्या डोम हाउस, बांबू हाउस आणि टेन्ट हाउस उभारलंय. शिवाय एक हॉल आणि संग्रहालयासाठी एक शेड उभी केलीय. या इमारती उभारताना अनेक प्रयोग करण्यात आलेत. प्लास्टिकच्या एकसारख्या आकाराच्या बाटल्यांमध्ये माती भरायची, त्यांची एक रांग तोंड वर करून उभी करायची. त्यावरील रांगेत माती भरलेल्या बाटल्या खाली तोंड करून लावायच्या, जेणेकरून मधली पोकळी भरून निघेल. मग पोल्ट्रीत वापरल्या जाणार्या चिकन नेटने दोन्ही बाजूंनी भिंत बांधायची आणि वर गिलावा करायचा, असा अजब प्रयोग केलाय. काही भिंतींना एका बाजूनं चिकन नेट आणि दुसर्या बाजूनं बारदानही वापरलंय. याखेरीज बांबू आणि लोखंडी प्लेट्सचा वापर करून केलेल्या या बांधकामांना तीनशे चौरस फुटांसाठी अवघा तीस हजार रुपये इतका खर्च आलाय. ‘एथ्नो ईको टूरिझम सेंटर’ नावानं हा परिसर विकसित होत आहे.
प्लास्टिकच्या बंगल्याला बांबूचं दार!
By admin | Published: June 05, 2014 12:01 AM