कोल्हापूर : वायू प्रदूषणात आघाडीवर असणाऱ्या देशातील १0७ शहरांमध्ये राष्ट्रीय हरित लवादाने फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कोविड काळात हे प्रदूषण वाढणार, याची काळजी घेण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, असा सल्ला न्यायालयाने दिला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे कोल्हापूरची दिल्ली होण्याची धोक्याची घंटा वाजली आहे. आदेश डावलून फटाके वाजविल्यास दोन हजार रुपये दंड, तर त्याचा साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांना दहा हजार रुपये दंड होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने फटाकेमुक्त होणार आहे.प्रदूषणात आघाडीवर असणाऱ्या देशभरातील शहरांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश असल्याचा अहवाल नॅशनल एन्व्हायर्न्मेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (निरी) या संस्थेने २0१८ मध्येच दिला आहे. कोविड विषाणू फैलावू नये म्हणून हरित लवादाकडे दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीत या शहरांमध्ये उपाययोजना कराव्यात आणि प्रामुख्याने फटाक्यांवर या शहरांत बंदी घालावी अशी सूचना न्यायालयाने केली आहे. कोल्हापुरातही स्थानिक प्रशासनाने यावर उपाय करावेत असे सुचविण्यात आले आहे.कोल्हापुरातील पर्यावरणप्रेमी संस्थांनीही प्रदूषणाविरोधात यापूर्वीच मोहीम उघडली आहे, परंतु त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. कोल्हापुरातील हवेत धूर आणि धुकं यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. यामागे अनेक कारणे आहेत. वणवे लावणे, शेती पेटवून देणे, चिपाडे पेटवणे, उद्योग धंदे आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या हे वायूप्रदूषणाला कारण ठरतात. याची संख्या कोल्हापुरात अधिक आहे.कार्बन डाय ऑक्साईड आणि नायट्रोक्सॉईड यांचे प्रमाण वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरते. हेच कारण जागतिक तापमान वाढीलाही कारणीभूत आहे. याशिवाय कार्बन मोनोक्सॉईडमुळेही प्रदूषण होते. ते प्रामुख्याने माणसांच्या आरोग्यावर परिणाम करतात. हे प्रमाण कमी करण्याबाबत उपाययोजना आखल्या पाहिजेत.
कोविड काळात फटाक्यांच्या वापरामुळे वायूप्रदूषणात जर वाढ झाली, तर श्वसन विकार व इतर आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता गृहीत धरून फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ही उपाययोजना कोल्हापुरात राबविली नाही तर भविष्यात कोल्हापूरची दिल्ली होण्याचा धोका आहे. या निकालामुळे ही धोक्याची घंटा वाजलेली आहे.- डॉ. मधुकर बाचुळकर, पर्यावरण अभ्यासक.