लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या पाच वर्षांपासून इचलकरंजी येथील एक व्यापारी गु्रप अंबाबाईच्या दर्शनाला चालत येणाºया शेकडो भाविकांना पाण्याची बाटली व केळी वाटप करण्याचे सेवाभावी कर्तव्य पार पाडत आहे.
व्यक्तिगत किंवा गु्रपचे नाव न घेता स्वखर्चातून ही सेवा देण्याचे काम या इचलकरंजी येथील व्यावसायिकांतर्फे सुरू आहे. अवघ्या दोन व्यावसायिकांंवर सुरू झालेली ही सेवा आता दहापेक्षा अधिक व्यावसायिक करीत आहेत. दिवसभर व्यवसाय करून सायंकाळी केळी व पाण्याच्या बाटल्यांची जमवाजमव करून रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत येथील तावडे हॉटेलच्या चौकात भाविकांना वाटप करण्याचे काम करीत आहेत.पाच वर्षांपूर्वी शिवाजी सूर्यकांत पोवार यांनी सुरुवातीला पाणी वाटपाचे काम केले. याच प्रेरणेतून पुढे दरवर्षी हा उपक्रम राबविण्याचा मनोदय करून ही सेवा सुरु केली. आता त्यांना येथील व्यापारी अभिजित अनिल नाईक, देवांश पोवार, नितीन शहा, प्रवीण उदगावे, धनंजय शेळके, अनिकेत शहा, रणजित गांडुगंडे, गणेश बेहेरे, स्नेहल पाटील, सागर पाटील, सिद्धार्थ पाटील, अभिजित डाके, विनोद घोडके, सर्वेश घोडके, राजू काजकर, रितेश शहा, सचिन बर्गे, असे छोटे मोठे व्यवसाय असलेले व्यावसायिक जमेल तशी मदत करतात.
यामध्ये मेस्त्री, गॉगल, मोबाईल शॉपी, चालक असे हे व्यवसाय करणारे असून रोजच्या मिळकतीतूनच ही सेवा देण्याचा छोटासा प्रयत्न सुरू आहे.दरवर्षी इचलकरंजीहून सुमारे १ हजारपेक्षा अधिक तर शिरोळ परिसरातील छोटीमोठी गावे तसेच सांगली फाटा पासून ५०० पेक्षा अधिक भाविक दररोज या मार्गाने देवीच्या दर्शनाला मार्गस्थ होत असतात. वर्षाला दररोज दीड हजारपेक्षा अधिक केळी व पाचशेहून अधिक पाण्याच्या बाटल्यांचे वाटप या इचलकरंजीच्या व्यावसायिकांकडून होत असल्याचे सांगण्यात आले.