कोल्हापूर : कर्नाटकातील साखरमिश्रीत गुळावर ‘कोल्हापुरी गुळाचा शिक्का मारून राजरोस विक्री होत असल्याने खरा कोल्हापुरी गुळाची बदनामी होऊन दरात मारले जाते. याबाबत समिती काही निर्बंध घालणार की नाही, कर्नाटकातील गूळ रोखा अन्यथा कोल्हापुरात येणाऱ्या गुळाच्या गाड्या फोडू,’ असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.गूळ हंगामाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने गूळ उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांची शुक्रवारी बैठक आयोजित केली होती. गूळ संशोधन केंद्राचे अधिकारी गुळातील घटक आणि वाढलेल्या साखरेच्या प्रमाणाबाबत माहिती देत होते.त्यात हस्तक्षेप करत ‘रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे म्हणाले, आम्ही गुळात साखर मिसळत नाही. कर्नाटकातील साखरमिश्रीत गूळ येथील व्यापारी खरेदी करतात, त्यावर ‘कोल्हापुरी गुळाची मोहर लावून विक्री करत असल्याने खऱ्या कोल्हापुरी गुळाला मार बसतो. कर्नाटकातील गूळ रोखा अन्यथा त्या गाड्या फोडू.
यावर, कर्नाटकातील गुळाचा दर कोल्हापुरी गुळाच्या दराशेजारीही येऊ शकत नसल्याचे व्यापारी विक्रम खाडे यांनी सांगितले. यामध्ये हस्तक्षेप करत आम्ही व्यापारी आहोत, कर्नाटकातील गूळ घेऊ नका, असे तुम्ही सांगू नये. कर्नाटकचा गूळ येथे येणारच, असे नंदकुमार वळंजू यांनी ठणकावले.
राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी गुळाबाबत घेतलेल्या बैठकीचे काय झाले? अशी विचारणा करत साखरेचा दर २९ रुपये प्रतिकिलो निश्चित केला त्या प्रमाणाने गुळाचा दर ४० रुपये निश्चित करावा, असा ठराव रंगराव वरपे (साबळेवाडी) यांनी मांडला.
अन्न, औषध प्रशासन विभागानुसार गुळातील ‘सल्फर’चे प्रमाण ७० पीपीएम असण्याची सक्ती आहे. हे प्रमाण पन्नास वर्षांपूर्वीचे असल्याने त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी समिती पुढाकार घेण्याची मागणी विक्रम खाडे यांनी केली. शिवाजी पाटील-कोपार्डेकर, अमर पाटील, भगवान काटे यांनी चर्चेत भाग घेतला.शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला गूळ समितीकडे पाठवून व हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सभापती कृष्णात पाटील यांनी केले. उपसभापती अमित कांबळे यांनी आभार मानले.