कोल्हापूर : धान्यचंद हॉकी स्टेडियम चौक ते पाचगाव रोडवरील शाहू कॉलनी, बालाजी पार्क येथील रस्त्याकडेचा ‘जिजाऊ’ आलेशान बंगला चोरट्यांनी फोडून सात तोळे सोन्या-चांदीचे दागिने व कार असा सुमारे वीस लाख किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याचे सोमवारी पहाटे उघडकीस आले. या घरफोडीचे वृत्त समजताच पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी करुन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडून डिव्हिआर चोरुन नेला.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, निखिल उत्तम मुळे (वय ३०) हे उद्यमनगर येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. वडिलांचे आठ वर्षापूर्वी निधन झाल्याने ते आणि आई उर्मिला (५०) असे दोघेच दोन मजली बंगल्यामध्ये राहतात. शनिवारी (दि. ६) रात्री कंपनीच्या कामानिमित्त ते सोलापूरला गेले होते. घरी एकटे राहणे असुरक्षित असल्याने त्यांची आई तोरस्कर चौक, जुना बुधवार पेठ येथील भाऊ संजय विकास आयरे यांच्या घरी राहण्यास गेल्या. त्यामुळे घराला कुलूप होते. सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास निखिल सोलापूरहून घरी आले असता बंगल्याच्या प्रवेशद्वारातील लोखंडी गेट उघडे होते. मुख दरवाजाचे कडी-कोयंडा व कुलूप तुटले होते. आतमध्ये पाहिले असता पाचही खोल्यातील साहित्य विस्कटलेले होते. कपाटातील साहित्य विस्कटून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. कपाटातील चावी घेऊन बाहेर पार्किंगमधील आलेशान कार (एम. एच. ०९ इव्ही २३००) चोरटे घेवून गेले. दोन वर्षापूर्वीच खरेदी केली होती. चोरीचा प्रकार पाहून त्यांना मानसिक धक्काच बसला. त्यांनी नातेवाईकांना फोनवरुन माहिती दिली. त्यानंतर जुनाराजवाडा पोलिसांत वर्दी दिली.
शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, राजारामपुरीचे नवनाथ घोगरे, लक्ष्मीपूरीचे वसंत बाबर, शाहुपूरीचे संयज मोरे यांचेसह गुन्हे शाखेच्या टिमने भेट देवून पाहणी केली. ठसे तज्ज्ञांसह श्वान पथकाने पाहणी केली. रामानंदनगर रोडच्या दिशेने काही अंतरावरचं श्वान घुटमळले. चोरटे त्या दिशेने पसार झालेचे दिसले. जिल्ह्यातील सर्वत्र नाकाबंदी करुन चोरीला गेलेल्या कारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शहराच्या नाक्यावरील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत.