कोल्हापूर : बँक खाती हॅक करून शिरोली एमआयडीसी श्रीराम फौंड्री या कंपनीची ३४ लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याचे कनेक्शन पश्चिम बंगालपर्यंत असल्याचे तपासात पुढे आले आहे. यामध्ये मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.
शिरोली एमआयडीसीतील श्रीराम फौंड्री या कंपनीच्या बँक खात्यावरील आॅनलाईन सिस्टीम भामट्याने काहींना हाताशी धरून सुरू केली. त्याआधारे त्याने दि. ८ मार्च रोजी बँकेच्या सहा खात्यांवरून २० व्यवहारांतर्गत ३४ लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले. याची नोंद सायबर पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी संबंधित बँकेची खाती सील करून तपास वेगाने सुरू केला आहे. विशेष म्हणजे भामट्याने कंपनीच्या पगारादिवशी खात्यावर जादा रक्कम असल्याची माहिती घेऊन बँक खाती हॅक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याचे कनेक्शन थेट पश्चिम बंगालपर्यंत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. ज्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे त्या संशयितांचाही शोध सुरू आहे. दीड वर्षाभरापूर्वी अशाच पद्धतीचा गंडा शहरातील एका वाहन वितरक कंपनीला पश्चिम बंगालमधील काहींनी घालता होता. त्याच टोळीचा या मागे हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे, याचीही माहिती घेतली जात असल्याचे पो.नि. मोरे यांनी सांगितले.मोठा अनर्थ टळलाकंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगार असल्याने त्यापोटी ही रक्कम खात्यावर जमा केली होती. ती रक्कम हॅकर्सनी हॅक करून लंपास केली, पण दुस-या दिवशी अधिका-यांच्या मोठ्या पगाराच्या रकमा याच खात्यावर वर्ग करण्यात येणार होत्या, पण अगोदरच हॅकर्सनी खाती हॅक केल्याने अधिकारी सावध झाले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.