कोल्हापूर : अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामावर ताण येत असल्याने कर्मचारी भरती करावी, अशी सातत्याने मागणी करूनदेखील व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होत असल्याने वैतागलेल्या बँक ऑफ इंडियातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी बँकेच्या दारात ठिय्या आंदोलन करून रोष व्यक्त केला. दुपारी दोनपर्यंत चाललेल्या या आंदोलनात पुढील महिन्यांत दोन दिवसांच्या लाक्षणिक संपाचा निर्णय घेण्यात आला.
बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन, पुणेच्या कोल्हापूर युनिटतर्फे हे आंदोलन झाले. कर्मचारी भरतीच्या मागणीसाठी गेल्या महिन्यात एकदिवसीय संप बँकेसमोर निदर्शने करीत ठिय्या आंदोलन केले. यात सुहास शिंदे, विकास देसाई, संजय देशपांडे, दीपक महेकर, पांडुरंग काईंगडे यांच्यासह सांगली, साताऱ्यातील कर्मचारी प्रतिनिधी सहभागी झाले होते.
यावेळी युनियनच्या शिष्टमंडळाने बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर हेमंत खेर यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली व वरिष्ठ स्तरावर लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या भावना कळवाव्यात, अशी विनंतीही केली. यात बँकेत शिपाई व सुरक्षारक्षकांची कमतरता आहे. खासगी सुरक्षारक्षक पुरविणारे जास्त बिल लावतात; त्यामुळे लष्करी सेवेतून निवृत्त झालेल्यांनाच बँकेत सुरक्षारक्षक म्हणून ड्यूटीवर घ्यावे अशी युनियनची मागणी आहे. याशिवाय शिपायांची संख्या खूपच कमी असल्याने कामावर ताण येत आहे. सर्व श्रेण्यांतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कामाचा बोजा वाढत चालला आहे. कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम करूनही मॅनेजमेंटची स्टाफशी वर्तणूकही अजिबात चांगली नाही. त्यांना सूचना द्याव्यात, अशा मागण्यांचा समावेश होता.
फोटो: ०५१२२०२०-कोल-बॅक ऑफ इंडीया
फोटो ओळ : कर्मचारी भरतीच्या मागणीसाठी शनिवारी कोल्हापुरात बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन, पुणेच्या कोल्हापूर युनिटतर्फे बँकेच्या दारात निदर्शने करून दुपारपर्यंत ठिय्या आंदोलन केले.