कणकवली : बँक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरातील सुमारे १९०० शाखांतून काम करणारे ए.आई. बी.इ.ए. च्या पाच हजारांवर सभासदांनी आपापल्या शाखेसमोर तीव्र निदर्शने केली. प्रामुख्याने व्यवस्थापनाने पुरेशी नोकर भरती करावी या प्रमुख मागणीसाठी ही निदर्शने करण्यात आली.बँकेच्या विविध अकराशेपेक्षा जास्त शाखेतून कायमस्वरूपी सफाई कर्मचारी नाहीत, तर सहाशेपेक्षा जास्त शाखेतून कायमस्वरूपी शिपाई नेमले गेलेले नाहीत. बँकेने गेल्या पाच वर्षांपासून मृत्यू, निवृत्ती, राजीनामा, पदोन्नती यामुळे रिकाम्या झालेल्या लिपिकांच्या जागा भरलेल्या नाहीत. त्या अंदाजे एक हजारपेक्षा जास्त जागा आहेत.
याशिवाय नवीन शाखा उघडल्या, व्यवसायात वाढ झाली, यामुळे रिकाम्या झालेल्या जागा या वेगळ्याच आहेत. पुरेशा कर्मचाऱ्यांच्या अभावी बँकेतील नित्याचे कामदेखील खासगी व्यक्तींना दिले जात आहे, ज्यामुळे बँकेत आर्थिक घोटाळे होण्याच्या शक्यता निर्माण होतात. याशिवाय बँक अनेक वर्षांपासून चालू असलेल्या प्रथेला सोडचिठ्ठी देऊन, कर्मचाऱ्यांशी निगडित निर्णय युनियनला विश्वासात न घेता एकतर्फी घेत आहे.ज्यावर युनियनने तीव्र आक्षेप घेतला आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात संघटनेतर्फे २६ फेब्रुवारी रोजी बँकेच्या देशभरातील ३७ झोनल कार्यालयासमोर धरणे, तर ६ मार्च रोजी केंद्रीय कार्यालय, लोकमंगल, पुणे येथे धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.सरतेशेवटी आमच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १२ मार्च रोजी देशव्यापी संप करण्यात येणार असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे रोहन परब, राजेश तावडे, संतोष मालवणकर, शुभम रामटेके आदी सहभागी झाले होते.