कोल्हापूर : नूल (ता. गडहिंग्लज) येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतील शाखा व्यवस्थापकांसह तिघांवर पैसे मागत असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्ते अकुंश कुराडे यांनी करून वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली होती. बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडून त्याची दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. व्यवसाय प्रतिनिधीस परिसरात बसण्याच्या परवानगीसाठी पैशांची मागणी केल्याचे आरोपात म्हटले आहे.
व्यवसाय प्रतिनिधीनी (बीसी सखी) राजलक्ष्मी बिरंजे यांनी इतर बँक मित्राप्रमाणे बँकेच्या परिसरात बसण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी शाखा व्यवस्थापकांकडे केली होती. बँक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परवानगीसाठी बिरंजे यांच्याकडून पैशांची मागणी झाल्याची तक्रार कुराडे यांची आहे. तक्रारीची दखल वरिष्ठ कार्यालयाकडून घेण्यात आली आहे. मात्र कुराडे यांनी केलेल्या आरोपात, तक्रारीत तथ्य नसल्याचे म्हणणे शाखा प्रशासनाचे आहे.
चौकट
अपमानास्पद वागणूक
बँक शाखेतील विशेष अधिकारी पदावरील कर्मचारी ग्राहकांना नेहमी अपमानास्पद वागणूक देते, सौजन्याने वागत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
कोट
आमच्या शाखेत माझ्यासह कोणीही कोणाकडे पैशांची मागणी केलेली नाही. केवळ ब्लॅकमेल करण्यासाठी तक्रारदारांनी तक्रार केली आहे. बँक मित्र आणि व्यवसाय प्रतिनिधींनी (बीसी सखी) बँकेऐवजी गावातच थांबून काम करणे अपेक्षित आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्याने काही जण दुखावले आहेत.
निलेश जाधव, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, नूल
कोट
नूलच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखा कार्यालयात आणि परिसरात बसण्यासाठी शाखा व्यवस्थापक नीलेश जाधव, कॅशिअर भीमा कोळी, शिपाई शिवानंद देसाई बीसी सखींकडून पैशांची मागणी केली आहे. याची तक्रार केल्यानंतर बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे.
अंकुश कुराडे, सामाजिक कार्यकर्ते