कोल्हापूर : बॅँकांमध्ये घोटाळे करणाऱ्यांना केवळ शिक्षा पुरेशी नसून, त्याबरोबरच त्यांना आर्थिक दंड करणे आवश्यक असल्याचे मत रिझर्व्ह बॅँकेचे माजी गव्हर्नर डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठातील बॅँक आॅफ इंडिया अध्यासनातर्फे आयोजित व्याख्यानावेळी ते बोलत होते.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षपदी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. यावेळी व्यासपीठावर रिझर्व्ह बॅँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. रेड्डी यांनी ‘बॅँकांची सुरक्षितता’ या विषयावर आपले विचार मांडले.
डॉ. रेड्डी म्हणाले, बॅँकामध्ये ठेवी ठेवताना नागरिक सर्व बाजूंनी विचार करतात. १०० टक्के ठेवी सुरक्षित आहेत, असे म्हणता येत नसले तरी त्या नाहीत असेही म्हणता येत नाही. २००१ साली अनुत्पादित कर्जाचे प्रमाण आतापेक्षा खूपच जास्त होते. मात्र नंतर त्यामध्ये सुधारणा होत गेल्या.
जगभरामध्ये २००८ मध्ये आर्थिक संकटामध्ये अनेक बॅँका अडचणीत आल्या तेव्हासुद्धा भारतातील बॅँका टिकून राहिल्या, याची आठवण करून देत डॉ. रेड्डी यांनी यासाठीची आपली आधीपासूनच तयारी होती असे नमूद केले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी प्रास्ताविक केले. त्यांच्या हस्ते यावेळी डॉ. रेड्डी आणि बॅँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यासन प्रमुख डॉ. व्ही. बी. ककडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर, ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंत थोरात, व्ही. बी. पाटील, अभय गांधी, बाळ पाटणकर, रवी शिराळकर, किरण कर्नाड, आदी मान्यवर उपस्थित होते.एसपीपी थोरात यांना अभिवादन !व्याख्यानाच्या सुरुवातीलाच डॉ. रेड्डी यांनी ले. जनरल एसपीपी थोरात यांना अभिवादन केले. चीनबाबत या कोल्हापूरच्या सुपुत्राने दिलेला सल्ला मानला नाही आणि त्याची किंमत आपल्याला चुकवावी लागली, असे ते म्हणाले.कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठातील बॅँक आॅफ इंडिया अध्यासनातर्फे शनिवारी रिझर्व्ह बॅँकेचे माजी गव्हर्नर डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी रिझर्व्ह बॅँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे उपस्थित होते.