आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बॅँकेचा प्रोटोकॉल अध्यक्ष बजरंग लगारे यांच्या चांगलाच अंगलट आला. तालुकांतर्गत कार्यक्रमाची ‘सीमा’ ओलांडल्याने विरोधकांना आयते कोलित हाती सापडले असून, हा मुद्दा सर्वसाधारण सभेतही गाजण्याची शक्यता आहे.
सेवानिवृत्त शिक्षक सभासद, सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार व स्वच्छ-सुंदर शाळांचा गौरव सर्वच संस्थांमध्ये होतो. शिक्षक बॅँकेत तालुकापातळीवर हा कार्यक्रम घेण्याची जुनी परंपरा आहे. तालुक्यातील शिक्षक संघटनांचे सर्व प्रतिनिधी, शिक्षक पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेत केला जातो.
साधारणत: मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तालुकास्तरावर कार्यक्रम घेतला जातो; पण बॅँकेची आर्थिक अडचण व काटकसरीचे धोरण म्हणून गेली दोन वर्षे बहुतांश तालुक्यांत कार्यक्रम झाले नव्हते. यंदा पन्हाळा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष बजरंग लगारे हेच शिक्षक बॅँकेचे अध्यक्ष आहेत. त्यात लगारे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांनी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार; डी. लिट. मिळाल्याबद्दल माजी मंत्री विनय कोरे यांचा याच कार्यक्रमात सत्कार असा संयुक्त कार्यक्रम रविवारी होत आहे. यासाठी पत्रिकाही काढण्यात आल्या; पण पत्रिकेत बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी व शिक्षक संघाच्या मच्छिंद्र देसाई प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश नाही.
‘बॅँकेला विक्रमी नफा मिळाला व बजरंग लगारे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ’ असा उल्लेख पत्रिकेच्या पहिल्या पानावर असल्याने वाद पेटला. पन्हाळा तालुक्यातील लगारे विरोधकांनी हा मुद्दा रेटल्याने ऐन कार्यक्रमाच्या तोंडावर बॅँकेचे सारे संचालक मंडळ तोंडावर पडले आहे. कारवाईच्या तोंडावर कार्यक्रम घेण्याचे धाडस! बॅँकेची कलम ८३ नुसार चौकशी होऊन संचालकांवर ठपका ठेवला आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाईही होऊ शकते. अशा परिस्थितीत अध्यक्षांनी एवढा मोठा कार्यक्रम घेण्याचे धाडस कसे केले? याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे. पत्रिका बदलण्याची नामुष्की शुक्रवारी (दि. ७) दिवसभर निमंत्रण पत्रिकेवरून गोंधळ सुरू होता. अखेर काही मंडळींनी समझोता करीत तालुक्यापुरत्या पत्रिका बदलण्याचा उपाय सुचविला. त्यांत चुकलेल्या नावांचा समावेश करण्यात आल्याचे समजते.