कोल्हापूर : पीक कर्ज घेण्याबाबत बँकांनी शेतकऱ्यांशी संपर्क करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. ग्राहकांकडून येणाऱ्या विविध योजनांचे प्रस्ताव बँकांनी तातडीने मंजूर करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहुल माने, भारतीय रिझर्व्ह बँकेचे महाप्रबंधक आर. के. महाना, साहाय्यक महाप्रबंधक मनोज मून, बँक आॅफ इंडियाचे आंचल प्रबंधक नितीन देशपांडे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने, आदी प्रमुख उपस्थित होते.विविध बँक आणि महामंडळाच्या उद्दिष्टपूर्तीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. यामध्ये काही बँकांनी ग्राहकांची खाती उघडली नसल्याचे निदर्शनास आले. या बँकांवर वरिष्ठ पातळीवरून कार्यवाही होण्यासाठी त्यांनी सूचना केल्या. महामंडळांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. त्याचबरोबर वसुलीमध्ये बँकांना महामंडळांनी सहकार्य करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे उद्दिष्ट २ हजार ३१५ कोटींचे देण्यात आले आहे. ३१ मार्च २०१९ अखेर २२२८.२६ कोटी इतके उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जिल्ह्याचे पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अमन मित्तल यांनीही यावेळी आढावा घेतला. राहुल माने यांनी स्वागत केले. यावेळी महामंडळांचे जिल्हा व्यवस्थापक आणि बँकांचे समन्वयक उपस्थित होते.