कोल्हापूर : दोन दिवसांचा संप आणि एका साप्ताहिक सुटीनंतर कोल्हापुरातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज सुरू झाले. त्यामुळे दुपारी चारवाजेपर्यंत बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी आणि रांगा दिसून आल्या.गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणारा वेतनवाढीचा करार तातडीने करावा, यासह अन्य मागण्यांसाठी सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप शुक्रवारी पुकारला. हा संप शनिवारीही कायम राहिला. त्यात रविवारी साप्ताहिक सुटी आली. त्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहिल्या. त्यामुळे आर्थिक व्यवहार करणे ग्राहकांना अडचणीचे बनले.
संपापूर्वी गुरुवारी शहरातील एटीएममध्ये भरण्यात आलेले पैसेदेखील शनिवारी बहुतांश प्रमाणात संपले होते. अशा स्थितीत सोमवारी बँकांचे कामकाज सुरू झाल्याने ग्राहकांनी सुटकेचा श्वास घेतला. महिन्याचा पहिला आठवडा असल्याने पेन्शनधारक आणि विविध बिले अदा करण्यासाठी व्यापारी, व्यावसायिक असलेल्या खातेदारांनी बँकांमध्ये गर्दी केली. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ग्राहक हे बँकांमध्ये येऊ लागले.
तासभरातच त्यांची गर्दी वाढली. पैसे काढण्यासाठी पेन्शनधारकांची रांग लागली होती. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँकांमध्ये गर्दी होतेच. मात्र, या संपामुळे दोन दिवस बँकांचे कामकाज ठप्प झाल्याने सोमवारी ग्राहकांची गर्दीत अधिकच भर पडली. दरम्यान, शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या ज्या-ज्या एटीएममधील पैसे संपले होते. ते भरण्याची काम दुपारपर्यंत बँकांकडून सुरू होते.
...अन्यथा मार्चमध्ये संपबँकिंग क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दोन दिवसांचा संप करण्यात आला. त्याची दखल घेऊन सरकारने सकारात्मक कार्यवाही करावी. अन्यथा दि. १३ ते १५ मार्च या कालावधीत पुन्हा संप करण्यात येणार आहे. दोन दिवसांचा संप करण्यापूर्वी त्याची पूर्वसूचना माहितीपत्रकामुळे ग्राहकांना दिली होती, असे बँक आॅफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी शाखेचे मुख्य प्रबंधक व्ही. एम. भातखंडे यांनी सांगितले.