कोल्हापूर : सर्वसाधारण झोपडपट्टी व मध्यमवर्गीय असा संमिश्र अशी वस्ती असणारा यादवनगर प्रभागात (क्रमाक ३५) या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली असून, प्रभाग खुला असल्याने किमान ३० जणांनी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. या प्रभागात दोन्ही काँग्रेसमध्ये काट्याची लढत होईल, अशी चिन्हे आता दिसत आहेत.
हा प्रभाग आहे. या प्रभागाचे नेतृत्व मागील पाच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली शमा मुल्ला यांनी केले होते. त्यांनी मिळालेल्या निधीतून अनेक कामे केली आहेत. काही कायदेशीर अडचणींमुळे त्या गेल्या दोन वर्षांपासून अलिप्त आहेत. हा प्रभाग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे पक्षाची अधिकृत उमेदवारी ज्याला मिळेल, त्याला जिंकण्याची अधिक संधी, असे मानले जाते. त्यात काँग्रेसचाही मतदार मोठा असल्याने खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यातच गृहीत धरली जात आहे. शिवसेनेचाही मतदार वर्ग वाढल्याने येथे तिन्ही पक्षांमध्येच लढत रंगणार, असे चित्र आहे. अत्यंत मध्यवस्तीतील हा प्रभाग आहे. कोटीतिर्थ तलावाच्या बाजूने व काहीअंशी उद्यमनगरचा भाग या प्रभागात समाविष्ट झाला आहे. या प्रभागातून मुल्ला यांच्यासह शिवाजी डवरी, जालिंदर पवार, रफिक मुल्ला, आप्पासाहेब गायकवाड यांनी महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी आणि ताराराणी आघाडी यांच्यात लढत झाली. यात शमा मुल्ला (राष्ट्रवादी) यांनी ताराराणी आघाडीच्या सुमय्या मुल्ला यांचा पराभव केला. सुमय्या यांना दुसऱ्या क्रमांकाची ९१६ मते मिळाली.
यंदा हा प्रभाग सर्वसाधारण झाल्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. यात सत्तार मुल्ला, माजी नगरसेवक रफिक मुल्ला, अश्विन शेळके, माजी नगरसेवक शिवाजी डवरी, विनोद शेंडगे, प्रेमसिंग रजपूत, सागर गायकवाड, संतोष देसाई, इरशाद बागवान, प्रकाश जाधव, महादेव कोरे, िफिरोज बागवान, अर्जुन शिंदे, आयुब शेख, लव यादव, उदय कांबळे, महेश तिवरे, देवेंद्र खराडे, दिवाकर कांबळे, तानाजी पवार, मिलिंद कांजर, दादू शिंदे, प्रकाश येडगे, सूरज पाटील, नितीन शिंदे, सतीश पवार, समीर मन्सूर जमादार, संदीप व्हडगे, युवराज पाटील, अशी तीसजणांच्या नावांची चर्चा या प्रभागात इच्छुक म्हणून आहे. या सर्वामध्ये आता संदीप कवाळे यांच्या एन्ट्रीमुळे रंगत वाढणार आहे. जाणकारांच्या मते पक्षाची उमेदवारी ज्याच्याकडे त्याला निवडून येण्याची संधी अधिक, असे मानले जात आहे. विशेषत: संदीप कवाळे, सत्तार मुल्ला, रफिक मुल्ला, अश्विन शेळके यांच्यातच खरी लढत मानली जात आहे. यात कोणत्या उमेदवाराला नेत्यांचे बळ लाभणार, यावरही नगरसेवक पद निश्चित मानले जात आहे. शमा मुल्ला यांच्या पतीचीही भूमिका महत्त्वाची आहे. मतदार आपल्याकडेच खेचून आणण्यासाठी तरुण मंडळांमध्ये अधिक रस्सीखेच झाली, तर संघर्ष अटळ आहे. त्यामुळे हा प्रभागातील निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष निश्चितच लागणार आहे.
प्रभागात झालेली कामे
- अमृत योजनेतून पाईपलाईन
- कन्हैया सर्व्हिंसिंग ते विश्वजित हाॅटेल ड्रेनेज लाईन
- कोटीतिर्थ तलाव येथे संरक्षित भिंत बांधली.
- प्रभागात एलईडी पथदिवे बसविले.
-नवीन शौचालये बांधकाम
- शिवाजी विद्यालयात फरशी बसविली. आदी कामांचा समावेश आहे.
शिल्लक कामे अशी,
- कोटीतिर्थ विद्यामंदिर इमारत दुरुस्ती
-विश्वजित हाॅटेल ते डवरी वसाहत कमान डांबरीकरण मंजूर
-डवरी वसाहत समाज हाॅल ते काळभैरव मंदिर रस्ता डांबरीकरण मंजूर
- भारत बेकरी ते सुतारांचे घर, बारगीर बोळ, डांबरीकरण मंजूर
-प्रभागातील अंतर्गत गटारी व डांबरीकरणासाठी मंजुरी
प्रभाग क्रमांक ३५, यादवनगर
शमा मुल्ला , विद्यमान नगरसेविका
गत निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते अशी,
एकूण मतदान -६५६४
झालेले मतदान : ४५७१
शमा मुल्ला (राष्ट्रवादी ) - २०६९ (विजयी)
सुमय्या मुल्ला (ताराराणी ) -९१६
सुनीता शिंदे (शिवसेना ) -७६०
माधुरी कोरे (अपक्ष) - २४२
प्रेमा डवरी - २३१
लैला पवार - १७६
मंगल हजारे (काँग्रेस) - १०१
फोटो : ०६०२२०२१-कोल-यादवनगर
आेळी : कोल्हापुरातील यादवनगर प्रभाग क्रमांक ३५ मधील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे.