आणखी दोन दिवसांनी आपल्या लाडक्या बाप्पांचं, विघ्नहर्त्याचं म्हणजेच श्रीगणेशाचं आगमन होत आहे. पार्वत्रीपुत्र गणेश हा पुराणकाळापासून कलियुगापर्यंत सर्वांनाच उत्सुकतेचा, आकर्षणाचा विषय आहे. त्याचा लळा आबालवृद्धांना आहे. त्याचे आगमन आणि पृथ्वीतलावरील त्याच्या वास्तव्यामुळे श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचे खरंतर अक्षरश: उधाणच आलेले असते म्हणूनच गणेश सर्वांना प्रिय आहे. ‘बुद्धीची देवता’ म्हणून ओळख असलेल्या गणेशाच्या आगमनाची एक महिना अगोदरपासून प्रतीक्षा लागलेली असते. लाखो तरुण त्याच्या स्वागतासाठी झटत असतात. कामधंदे, दिवस-रात्र, तहानभूक सारं-सारं काही विसरून या गणेशाच्या स्वागतासाठी तरुण देहभान विसरून गेलेले असतात. यंदाही गेले महिनाभर हा उत्साह पाहायला मिळत आहे. आषाढ महिन्यातील गल्ली जत्रा झाली की मग तरुण मंडळांचे कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या तयारीला लागतात. संपूर्ण श्रावण महिन्यात त्याचे नियोजन सुरू होते. वर्गणी मागण्यापासून बाप्पांचे आगमन, वास्तव्य काळातील दहा दिवसांचे कार्यक्रम आणि त्यानंतर विसर्जन मिरवणूक यांचे सगळे नियोजन अगदी पद्धतशीर, तसेच वैशिष्ट्यपूर्ण असते. कुठेही, कसलीही कमतरता ठेवली जात नाही. यंदाच्या गणेशोत्सवामुळे शहरातील वातावरण आता पूर्ण गणेशमय झाले आहे. जागोजागी मंडप, कमानी सजल्या आहेत. सजावटीच्या साहित्यांनी दुकाने, मंडई सजलेल्या पाहायला मिळतात. सगळेकडे कसे उत्साही वातावरण आहे आणि या वातावरणाशी अवघे कोल्हापूर समरस झाले आहे.गणेशोत्सव जवळ आला की, पारंपरिक चर्चा होताना पाहायला मिळते, तशी ती यंदाही सुरू आहे. डॉल्बी हा कळीचा मुद्दा या चर्चेचा केंद्रबिंदू असतो. आवाजाच्या प्रदूषणाबरोबरच नदीच्या प्रदूषणाचा विषयसुद्धा चर्चेच्या अग्रभागी असतो. यावर्षीही ही चर्चा आहेच. एकूणच गेल्या आठ-दहा वर्षांपासून डॉल्बी आणि नदी प्रदूषण याविषयी होत असलेली चर्चा आणि जनजागृतीमुळे काही चांगले परिणाम दिसून येत आहेत. गेल्यावर्षी ७० टक्क्यांहून अधिक घरगुती गणेशमूर्ती दान स्वरूपात मिळाल्या आहेत. नदीत, तलावात सोडल्या जाणाºया गणेशमूर्तींचे विसर्जन आता पर्यायी विसर्जन कुंडात, काहिलीत किंवा प्रशासन, महानगरपालिकांनी निश्चित केलेल्या खणीतून केले जात आहे. डॉल्बीमुक्त गणेशोत्सवालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्यावर्षी आपण त्याचा अनुभव घेतला आहे. काही गणेशोत्सव मंडळांनी प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यावर जोर दिला आहे, तर काहींनी गणेशोत्सवाच्या काळात प्रसाद वाटपासारखे कार्यक्रम करण्याला अग्रक्रम दिला आहे. बहुतांशी मंडळांनी जमलेल्या वर्गणीतून प्रत्येक वर्षी ‘श्रीं’च्या मूर्तीस चांदीचे दागिने तयार करण्याची भूमिका बजावली आहे. काही मंडळे डॉल्बीऐवजी ढोल-ताशा पथक तयार करीत आहेत. एकंदरीत आपला गणेशोत्सव दिवसेंदिवस विधायक बनत चाललेला आहे. त्यात शंका घेण्यासारखे काहीच कारण नाही. तरीही अजून प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण दहा-पंधरा टक्के मंडळांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे.गणेशोत्सवाचा असा हा उत्साहवर्धक माहोल असतानाच दोन दिवसांपूर्वी एका कीर्तनकाराची आॅडिओ क्लिप व्हॉटस् अॅपवर व्हायरल झाली आहे. कीर्तनकार हे सुद्धा एक समाजसुधारकच असतात. त्या भावनेतूनच त्यांनी एक चांगला संदेश आपल्या कीर्तनातून दिला आहे. ‘चित्रपटाची गाणी लावायची आणि त्याच्यावर मुलांनी नाचायचे ते सुद्धा गणपतीसमोरच. हे करू नका’ असा संदेश त्यांनी दिला आहे. त्यांनी एक छान उदाहरणही दिले आहे. ‘अन्य धर्मीय लोक त्यांचे सण, उत्सव साजरे करतात; पण असली गाणी लावून आणि त्यावर बेधुंद होऊन नृत्य करीत नाहीत. अन्य धर्मीयांना जर हे कळत असेल, तर मग आपणाला का कळत नाही?’ धार्मिक उत्सवाचे पावित्र्य आपणसुद्धा जपले पाहिजे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना गणेश विसर्जनाची मिरवणूक काढताना ‘शांताबाई’ कशाला पाहिजे? ‘खिच मेरी फोटो’ म्हणत कशाला नाचायला पाहिजे? एकेकाळी पन्नास ते साठ मंडळे डॉल्बी लावत होती; पण गेल्यावर्षी सोळा मंडळांनी डॉल्बी लावली. बदल घडत आहे; परंतु ज्यांच्यामुळे दुधात मिठाचा खडा पडतो, अशा मंडळांवर विशेष लक्ष ठेऊन त्यांना विधायकतेकडे वळविण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने नव्हे, तर त्या-त्या परिसरातील प्रमुख मंडळींनीच केला पाहिजे. सरतेशेवटी गणेशोत्सव साजरा करणाºया मंडळांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा मनावर घेतले पाहिजे. गणेशोत्सव धार्मिक वातावरणात साजरा करीत असताना त्याला विधायकतेची झालर लावण्याचा देखील प्रयत्न करणे आवश्यक आहे. चांगल्या कामाची सुरुवात करायला विलंब नको. चला, ‘गणपती बाप्पा मोरया...’- भारत चव्हाण
बाप्पा मोरया ......
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:30 AM