कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागामध्ये भाभा अणू संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) सहकार्याने इंडियन एन्व्हायर्न्मेंटल रेडिएशन मॉनिटरिंग नेटवर्क (आयर्मोन) ही सुविधा प्रस्थापित करण्यात आली. त्यामुळे अणुसंशोधनातील नवे दालन खुले झाले आहे. ही सुविधा प्रस्थापित करणारे शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.या सुविधेचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. भाभा अणू संशोधन केंद्राने ही सुविधा विद्यापीठामध्ये मोफत प्रस्थापित केली आहे. पर्यावरणात विविध प्रकारचे किरणोत्सार (रेडिएशन) असतात. त्यामध्ये गॅमा रेडिएशनचाही समावेश असतो. या किरणोत्सारांच्या पातळीचे मापन, नोंदी घेऊन, त्यावर सातत्याने नजर ठेवून विशिष्ट मर्यादेपलीकडे ती गेल्यास त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही करणे या दृष्टीने ही सुविधा महत्त्वाची असते.त्याचप्रमाणे अणुसंशोधन क्षेत्रामधील संशोधक, शिक्षक व विद्यार्थी यांना या सर्व माहितीचा अभ्यास व विश्लेषण यांसाठी अतिशय महत्त्वाचा उपयोग होणार आहे.
विद्यापीठीय अणुसंशोधन क्षेत्रात या निमित्ताने एक नवे दालन खुले झाले असल्याची माहिती डॉ. शिर्के यांनी दिली. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, पदार्थविज्ञान अधिविभागप्रमुख डॉ. पी. एस. पाटील, व्ही. जे. फुलारी, एन. व्ही. मोहळकर, आर. एस. व्हटकर, एम. व्ही. टाकळे, एन. एल. तरवार, आदी उपस्थित होते.
सर्व प्रकारच्या किरणोत्सारांचे मापन करता येणारजमिनीमधील युरेनियम, थोरियम आणि पोटॅशियम हे पदार्थ सातत्याने किरणोत्सार करीत असतात. युरेनियमचे प्रमाण एक ते पाच पीपीएम आणि थोरियमचे प्रमाण दोन ते १० पीपीएम असते. जमिनीत मुळातच अवघे एक ते दोन टक्के पोटॅशियम असते. त्यातीलही केवळ ०.०१२ टक्के इतकेच पोटॅशियम किरणोत्सारी असते. याखेरीज अवकाशात, पर्यावरणात, हवेतही काही विशिष्ट प्रकारचे किरणोत्सार उपलब्ध असतात.
काही विशिष्ट मर्यादेपर्र्यंत त्यांचा मानवावर काही अनिष्ट परिणाम होत नाही. मात्र, पातळी ओलांडल्यास ती मानवी आरोग्यास धोकादायक ठरू शकते; म्हणून त्यांचे सातत्याने मापन करीत राहणे आवश्यक असते. अशा सर्व प्रकारच्या किरणोत्साराचे मापन करणे ‘आयर्मोन’ सुविधेमुळे शक्य होते.नैसर्गिक किरणोत्साराची पातळी ओलांडली जात असल्याचे यामुळे वेळीच लक्षात येऊ शकते आणि त्यावर गरजेनुसार लघू, मध्यम आणि दूरगामी स्वरूपाच्या योग्य उपाययोजना करणेही संशोधकांना शक्य होते. त्या दृष्टीने नैसर्गिक पर्यावरणीय किरणोत्साराच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे दालन विद्यापीठात खुले होत असल्याचे डॉ. आर. जी. सोनकवडे यांनी सांगितले.