कोल्हापूर : कोल्हापूरचे वैभव असलेल्या रंकाळा तलावाच्या प्रदूषण मुक्तीसाठी झालेल्या राष्ट्रीय सरोवर प्रकल्प-१ च्या आठ कोटी रुपयांच्या खर्चाची व प्रस्तावित प्रकल्प-२ च्या १२५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची चौकशी गुजरातमधील महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा यांच्या पर्यावरण विभागातील तज्ज्ञांच्या समितीमार्फत करण्याचे आदेश देत राष्ट्रीय हरित लवादाच्या न्या. व्ही. आर. किंगावकर व तज्ज्ञ सदस्य अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने सोमवारी दिले. कोल्हापूर येथील नागरिक सुनील केंबळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. हा अहवाल १६ जानेवारीपर्यंत लवादापुढे ठेवण्याचे आदेशही लवादाने दिले आहेत. महापालिकेतर्फे वकील धैर्यशील सुतार यांनी वालचंद महाविद्यालयाने ही चौकशी करण्यासंदर्भात इच्छा दर्शविली नाही. तसेच त्यांचे मानधन हे वाढीव आहे. तसेच ‘निरी’ या संस्थेची फीसुद्धा भरमसाट असल्याने एकदा महापालिकेने मोठी रक्कम खर्च करून प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रस्तावित १२५ कोटींच्या आराखड्याच्या चौकशीसाठी मोठी रक्कम खर्च करणे म्हणजे सार्वजनिक पैशांचा अपव्यय असल्याचे लवादास सांगितले. त्यामुळे इतर पर्यायांवर विचार लवादाने करावा, अशी विनंती केली. त्यावर लवादासमोर उपस्थित असलेल्या विरेल शहा या गुजरात सरकारच्या वकिलांना लवादाने पाचारण केले व त्यांना गुजरातमधील सयाजीराव विद्यापीठ इच्छुक आहे का? यासंबंधी विचारणा करण्यास सांगितले व सुनावणी १५ मिनिटानंतर ठेवली. त्यावर वकील शहा यांनी बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठ (एम. यस. विद्यापीठ) करू शकते, असे लवादास सांगितले. त्यावर महापालिकेतर्फे वकील धैयशील सुतार यांनी जर हे विद्यापीठ वाजवी फी आकारून करीत असेल, तर हरकत नसल्याचे सांगितले. त्यावर लवादाने रंकाळा प्रदूषण मुक्तीच्या दोन्ही झालेल्या व प्रस्तावित प्रकल्पांची चौकशी या विद्यापीठाने करावी, असा आदेश मंजूर केला व याचिकाही निकाली काढत पुढील कारवाईवर लवादाची देखरेख राहील, असे स्पष्ट केले. सध्या १२५ कोटींचा प्रस्ताव राष्ट्रीय सरोवर संवर्धन प्रकल्प-२ अंतर्गत ७५ कोटी रुपयांपर्यंत कमी केल्याचे महापालिकेचे वकील धैर्यशील सुतार यांनी याआधीच स्पष्ट केले. त्यामुळे यातील चौकशीनंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होणार आहेत. तोपर्यंत महापालिकेस निधी मिळणार नसल्याचे लवादाने स्पष्ट केले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळास जागे कोण करणार...महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने यंत्रणा असूनसुद्धा या प्रकल्पाची चौकशी करण्याची इच्छा दाखविली नाही, यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. तसेच यांना कोण जागे करणार, अशी टिप्पणीसुद्धा केली. या निष्क्रियतेची दखल लवाद घेत आहे, अशीसुद्धा नोंद आदेशात केली व सविस्तर आदेश मंजूर केला.विशेष कौतुक महापालिकेचे वकील धैर्यशील सुतार यांचे याकामी अतिशय वाजवी व रंकाळा तलाव प्रदूषण मुक्तीसाठी विधायक भूमिका घेतल्याबद्दल आदेशात कौतुक केले. त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचेसुद्धा खासकरून कौतुक केले.
रंकाळा प्रदूषणाची चौकशी आता बडोदा विद्यापीठाकडे
By admin | Published: December 15, 2015 12:18 AM