सातारा : नेपाळमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपाच्या वेळी जिल्ह्यातील बारा जण नेपाळमध्ये विविध ठिकाणी होते. ते सर्वच्या सर्व सुखरूप असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षातून देण्यात आली आहे.दोन स्वतंत्र टूरिस्ट कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील एकूण सहा पर्यटक नेपाळला गेले आहेत. नवनाथ कवडे, संजय भापकर, सुभाष कदम, अतुल मोरे, दिनेश पवार आणि रेखा पवार अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण काठमांडू येथे सुखरूप असल्याची माहिती संबंधित टूरिस्ट कंपन्यांनी कळविली आहे.दरम्यान, राहुल तिरवा, गौरी तिरवा, रघुनाथ तिरवा, राही तिरवा, पद्मसिंह विश्वकर्मा, रितिश विश्वकर्मा हे आणखी सहा जण जिल्ह्यातून नेपाळमध्ये गेले आहेत. या सहाजणांनी कोणत्याही यात्रा कंपनीच्या माध्यमातून न जाता ते स्वतंत्रपणे गेले आहेत. पूर्णा तिवरा नावाचे त्यांचे नातेवाइक काठमांडूपासून जवळच राहतात. त्यांच्या घरी वरील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)एव्हरेस्टवीर आशीष माने काठमांडू विमानतळावरसातारा येथील एव्हरेस्टवीर आशीष माने नवोदित गिर्यारोहकांना प्रशिक्षण देण्यासाठी सध्या नेपाळमध्ये आहे. तो तेथे पोहोचताच भूकंप झाला आणि त्याच्यासह सर्व गिर्यारोहक लॉजमधून रस्त्यावर धावले. शनिवारची रात्र या सर्वांनी लॉजबाहेरच काढली. आता हे सर्वजण काठमांडू विमानतळावर पोहोचले असून, काठमांडूतून बाहेर पडू इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या यादीत त्यांचा ६०० वा क्रमांक आहे. भारतीय विमाने काठमांडूहून रवाना झाली असून, ती परतण्याची त्यांना प्रतीक्षा आहे. त्यातच पाऊस सुरू झाल्याने उड्डाणे रद्द झाली असून, अडचणींमध्ये भर पडली आहे. नंबर मिळताच आशीष आणि इतर गिर्यारोहक काठमांडूहून दिल्लीला रवाना होतील. तेथून आशीष पुण्याला आणि तेथून सातारला येईल, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.
बारा सातारकर नेपाळमध्ये सुखरूप
By admin | Published: April 26, 2015 10:36 PM