संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येथील राजाराम महाविद्यालयाला विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी यंदा १७२ तासिका तत्त्वांवरील प्राध्यापकांचा (सीएचबीधारक) आधार घ्यावा लागणार आहे. महाविद्यालयातील पूर्णवेळ प्राध्यापकांची २८ पदे गेल्या १0 वर्षांपासून रिक्त आहेत. या पदांची भरती व्हावी, यासाठी महाविद्यालयाकडून सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.महाविद्यालयातील वरिष्ठ अनुदानित विभागासाठी पूर्णवेळ प्राध्यापकांची ५९ पदे मंजूर असून, त्यापैकी १८ रिक्त आहेत. कनिष्ठ अनुदानित विभागामधील मंजूर १९ पदांपैकी १० पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमधील वरिष्ठ, कनिष्ठ विभागाकरिता १ : ३ या तत्त्वानुसार सीएचबीधारकांची शैक्षणिक वर्षाकरिता नियुक्ती केली जाते. महाविद्यालयात गेल्या तीन वर्षांपासून एम.एस्सी. केमिस्ट्री, एम.ए. गृहशास्त्र, बी. कॉम. प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष, बी.एस्सी. अवकाश संशोधन, नॅनो टेक्नॉलॉजी, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र, बी.ए. संगीत अभ्यासक्रम शासन मान्यतेनुसार शिकविण्यात येत आहेत. त्यासाठी सीएचबीधारकांची नियुक्ती केली जाते. कनिष्ठ विभागातील राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी अर्धवेळ प्राध्यापकांच्या नियुक्तीला मान्यता आहे; त्यामुळे या पदांचे कामदेखील सीएचबीधारकांवर सोपवावे लागत आहे. अर्धवेळ प्राध्यापकांच्या पदावर १:२ याप्रमाणे सीएचबीधारकांची नियुक्ती करण्यात येते. कॉलेजचे शैक्षणिक कामकाज सांभाळण्यासाठी दरवर्षी १६० ते १७० सीएचबीधारकांचा आधार घ्यावा लागत आहे. रिक्त पदे, अर्धवेळ पदांमुळे सध्या कार्यरत पूर्णवेळ प्राध्यापकांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. रिक्त पदांबाबतची ही स्थिती येथील गुणवत्तेला मारक ठरणार आहे.गुणवत्तेवर परिणामरिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून केली जाते; मात्र, एमपीएससीकडून पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. सीएचबीधारकांची दरवर्षी नियुक्ती करावी लागते. वर्षागणिक सीएचबीधारकांमध्ये बदल होतो. त्याचा परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होतो. ते विद्यार्थ्यांसाठी मारक ठरणारे आहे.
‘राजाराम’ला १७२ ‘सीएचबी’धारकांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:45 AM