कोल्हापूर : खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला निवडणूक आयोगाकडून ‘बॅट’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. लोकसभा निवडणूक याच चिन्हावर लढविली जाणार असल्याने, खासदार शेट्टी कशी बॅटिंग करतात आणि निवडणूक जिंकतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागणार आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी गेल्या १० वर्षांपासून हातकणंगले मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी ‘स्वाभिमानी’ हा पक्षही स्थापन केला आहे; पण एकूण मतांपैकी सहा टक्के मते मिळाली तरच तो पक्ष अधिकृत होऊन त्याची नोंदणीही निवडणूक आयोगाकडे होते. तसेच त्यांना कायमस्वरूपी निवडणूक चिन्हही मिळते; पण खासदार शेट्टी हे एकटेच प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांना लोकसभा निवडणूक लढविताना दरवेळी वेगळ्या चिन्हाची निवडणूक आयोगाकडे मागणी करावी लागते.हातकणंगलेतून २००९ मध्ये ‘रिडालोस’तर्फे रिंगणात उतरलेल्या शेट्टी यांना ‘कपबशी’ हे चिन्ह मिळाले होते. त्याच वेळी कोल्हापूर मतदारसंघात अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या खासदार सदाशिवराव मंडलिक यांनादेखील हेच चिन्ह मिळाले होते. २०१४ मध्ये महायुतीतर्फे पुन्हा शेट्टी रिंगणात आले. यावेळी त्यांना ‘शिट्टी’ हे चिन्ह मिळाले. या दोन्हीही निवडणुकांत शेट्टी मोठ्या फरकाने विजयी झाले आणि विशेष म्हणजे शिट्टी हे चिन्हही गाजले होते. त्यांच्या प्रचाराचे निम्मे काम या शिट्टीनेच केले होते.आता तिसऱ्यांदा हॅट्ट्रिकच्या अपेक्षेने रिंगणात उतरलेल्या शेट्टी यांना बॅट चिन्ह मिळाले आहे. कळत्या वयापासून सर्वांचे ‘बॅट’शी नाते जुळलेले असल्यामुळे बॅट हे चिन्ह प्रचारात वापरताना सोपे जाते. मागील दोन्ही निवडणुकांत जिल्हा आणि प्रादेशिक पातळ्यांवर गाजणारे शेट्टींचे नेतृत्व यावेळच्या निवडणुकीवेळी मात्र राष्ट्रीय स्तरावरील झाले आहे. शेतकऱ्यांच्या मोर्चाद्वारे देशपातळीवर नेतृत्वाची मोहर उमटविणारे खासदार शेट्टी घरच्या मैदानात कशा प्रकारे बॅटिंग करतात आणि मॅच जिंकून देतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहणार आहे.