कोल्हापूर : भालदार चोपदार, वाजंत्री, घोडेस्वार असा शाही लवाजमा, अंबा माता की जयचा गजर आणि भाविकांच्या गर्दीत शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा अवभृत स्नान सोहळा रंगला. देवधर्म, धार्मिक अनुष्ठानाच्या पवित्र अधिक महिन्यात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा पंचगंगा नौका विहाराचा नेत्रसुखद सोहळा झाला. सृष्टीचा सांभाळ करणारी अंबाबाई आणि कोल्हापुरकरांची जीवनदायिनी पंचगंगा भेटीचा हा सोहळा भाविकांनी डोळ्यात साठवला.तीन वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाकडून मंदिरात धार्मिक अनुष्ठान करण्यात आले. याची सांगता शनिवारी देवीच्या अवभृत स्नान सोहळ्याने झाली. श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती वर्षातून फक्त तीनदा मंदिराबाहेर येते. कोल्हापुरकरांना आपल्या वरदहस्ताचे दान देत ती मंदिरात परतते. पण यंदा अवभृत स्नानाच्या निमित्ताने अंबाबाई पंचगंगेच्या भेटीला गेली. सकाळी साडे दहा वाजता शाही लव्याजम्यानिशी तसेच फुलांनी सजवलेल्या पालखीत देवीची उत्सवमूर्ती विराजमान झाली. महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश मार्गे पंचगंगा घाटावर पालखीचे आगमन झाले. येथे देवीचे पूजन झाले. पंचगंगेवला माता मानतो त्या नदीचे पूजन झाले, नदीची ओटी भरण्यात आली. त्यानंतर अंबाबाईचा अवभृत स्नान सोहळा झाला. या नंतर बोटीतून देवीचा पंचगंगा नौका विहार झाला. त्यानंतर पालखी याच मार्गे दुपारी साडेतीन वाजता मंदिरात आली. श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनीश्वर व मयूर मुनिश्वर यांनी धार्मिक विधी केले. यावेळी हजारो भाविक पंचगंगा काठावर उपस्थित होते.
अंबाबाईची सवारी..पंचगंगेच्या विहारी; कोल्हापुरात नदी घाटावर रंगला अवभृत स्नान सोहळा
By इंदुमती सूर्यवंशी | Published: August 12, 2023 7:29 PM