कोल्हापूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) गुरूवारपासून सुरू झाली. ‘टेन्शन घेऊ नकोस’, ‘शांतपणे पेपर सोडव’, अशा सूचना समजून घेत आणि काहीशा तणावामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पहिला पेपर दिला.शहरातील कमला महाविद्यालय, राजाराम महाविद्यालय, विवेकानंद कॉलेज, गोखले कॉलेज, महावीर महाविद्यालय, शहाजी कॉलेज, कॉमर्स कॉलेज, न्यू कॉलेज, आदी परीक्षा केंद्रे सकाळी दहा वाजल्यापासून परीक्षार्थ्यांच्या गर्दीने फुलून गेली. परीक्षा केंद्रावर विद्यार्थी-विद्यार्थीनींना ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात येत होता. त्यांना पेपर प्रारंभाच्या अर्धा तास आधी केंद्रात सोडण्यात आले.
परीक्षार्थ्यांना पेपर नीट वाचता यावा, ते गोंधळून जाऊ नयेत यासाठी दहा मिनिटे आधी पेपर देण्यात आला. पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांना केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी होती. मोबाईल, कॅमेरा असलेले स्मार्ट वॉच,पेन परीक्षार्थींकडे नाहीत ना याची तपासणी परीक्षा केंद्रांवरील व्यवस्थेकडून करण्यात आली. पालक, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी पेपर सुटेपर्यंत आपल्या पाल्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर थांबून होते.
दरम्यान, परीक्षार्थींना त्यांचे पालक, मित्र-मैत्रिणींनी शुभेच्छा दिल्या. काही राजकीय नेते, लोकप्रतिनिधींनी विविध महाविद्यालयांच्या परिसरात, महत्त्वाच्या चौकांमध्ये शुभेच्छांचे फलक लावले होते. सोशल मिडियावर परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षा कालावधीमध्ये घ्यावयाची दक्षता आदींबाबतचे संदेश परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांना इतरांकडून पाठविण्यात आले होते.पोलिस बंदोबस्त, भरारी पथकांच्या भेटीपरीक्षेतील पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाची भरारी पथकांनी विविध केंद्रांना भेटी दिल्या. प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त होता.