मी पाहिलेली व माझ्या आठवणीत राहणारी निवडणूक म्हणजे १९७७ मध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चुरशीने झालेली शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार दाजिबा देसाई व कॉँग्रेसचे उमेदवार शंकरराव माने यांच्यातील लढत. आणीबाणीनंतरची पहिलीच निवडणूक असल्याने वातावरण उत्साही व जोशपूर्ण होते.त्या काळात कोल्हापूर शहर म्हणजे ‘शेकाप’चा बालेकिल्ला होता. तसेच डाव्या विचारसरणीचे पुरोगामी शहर म्हणूनही याकडे पाहिले जायचे. कोल्हापूर मतदारसंघातील दाजिबा देसाई व शंकरराव माने यांची निवडणूक आपण जवळून पाहिली आहे. त्यावेळी मी अवघ्या विशीत होतो. त्या काळात सध्यासारखी हायटेक प्रचार यंत्रणा नव्हती. प्रचारासाठी रात्ररात्र जागून एक ग्रुप आपल्या भागातील मोक्याच्या जागी असणाऱ्या भिंती निवडत असे. त्यात मीही होतो. स्वत: घरी तयार केलेला चुना, झाडूचा ब्रश करून निवडलेल्या भिंतींवर ‘शेकाप’ लिहून ती जागा आरक्षित केली जायची. त्यानंतर सुंदर अक्षर असलेला कार्यकर्ता या भिंतीवर उमेदवाराचे नाव, चिन्ह काढून त्याखाली ‘कोल्हापूरच्या विकासासाठी यांनाच विजयी करा’ असे लिहीत असे.आणीबाणीनंतरची पहिलीच निवडणूक असल्याने वातावरण उत्साही व जोशपूर्ण होते. निवडणूक चुरशीची असली तरी प्रचारामध्ये एक मर्यादा व संयम होता. आजच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवाराचे चारित्र्यहनन व वैयक्तिक पातळीवर होणारी टीका, त्या काळात नव्हती. अतिशय सुसंस्कृत व शिस्तबद्ध पद्धतीने उमेदवार व कार्यकर्तेही आपल्या उमेदवारासाठी जिवाचे रान करीत होते. प्रचारसभेतही उमेदवार व प्रमुख वक्ते एकमेकांचा आदरपूर्वक उल्लेख करीत होते. एकमेकांचा उद्धारही करीत नसत. प्रचारात प्रामुख्याने मतदारसंघाचा विकास, महागाईसह, सर्वसामान्य जनतेच्या अडचणी कशा सोडविल्या जातील, हे सांगितले जात होते. सध्या प्रचारात विकासाचे मुद्दे कमी व बोचरी टीका जास्त होत आहे. त्या काळात गल्लीगल्लींतून, बोळांतून ‘....यांना निवडून द्या’ अशा घोषणा देत फिरणारा बालचमूही सर्वांचे लक्ष वेधत होता. त्यावेळी पक्षाचे नेते, उमेदवार व कार्यकर्ते यांची पक्षनिष्ठा ही वाखाणण्यासारखी होती. ‘जीव गेला तरी चालेल; पण पक्ष बदलणार नाही,’ अशा नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कडवी फौज ही उमेदवाराला ताकद देणारी होती. सध्या कार्यकर्ते व उमेदवारांची पक्षनिष्ठा शोधावी लागते. या काळात दाजिबा देसाई व शंकरराव माने यांच्यातील चुरशीची लढत चांगलीच गाजली. यामध्ये दाजिबा देसाई यांनी १६५ मतांनी विजय मिळविला.अरुण सावंत, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशन
चुरशीची लढाई; पण वैयक्तिक टीका नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:07 AM