सरदार चौगुले -- पोर्ले तर्फ ठाणे --विकासाची मोहोर उमटवलेल्या आणि पन्हाळा तालुक्याच्या राजकीय सारीपाटावर कळीच्या मुद्द्याने चर्चेत असणाऱ्या पोर्ले तर्फ ठाणे जिल्हा मतदारसंघात ओबीसी महिला सदस्याचा वट राहणार आहे. हा मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाल्याने अनेक वर्ष प्रतीक्षेत असणाऱ्या राजकर्त्यांची घोर निराशा झाली. तरीही जिल्ह्यातील राजकीय अस्तित्वासाठी आणि पक्षाच्या प्रतिष्ठेसाठी या निवडणुकीत नेत्यांना झुंजावे लागणार आहे. भाजपचा ‘जनसुराज्य’शी मैत्रीपूर्ण करार फिसकटला, तर या मतदारसंघात भाजप स्वबळाचा ‘शड्डू’ ठोकण्याच्या तयारीत आहे. जनसुराज्यने सलग तीनवेळा सत्ता प्रस्थापित केल्याने मतदारसंघावर पंधरा वर्षे याच पक्षाचे प्राबल्य आहे, तर राष्ट्रवादीला विजयाचा शिक्कामोर्तब करायला झगडावे लागत आहे. पंधरा वर्षांत राष्ट्रवादीच्या हातात सत्तेचे धनुष्य नसल्याने कुरघोडीच्या राजकारणात गारठलेल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मेळाव्यात ‘राजकीय लढाईची’ थाप दिल्याने कार्यकर्त्यांत राजकीय ऊर्जा निर्माण केली. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.वीस वर्षांपूर्वी काँग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या या मतदारसंघावर जनसुराज्य पक्षाने छाया नंदकुमार गुरव याच्या रूपाने पहिल्यांदा ‘नारळ’ फोडला. २००६ मध्ये दत्त साखर कारखाना ‘वारणेकडे’ चालवावयास घेतल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकीय समिकरणे बदलली. त्यामुळे उल्काराणी प्रकाश पाटील यांना जिल्हा परिषद सदस्याची ‘लॉटरी’ लागली. २०१२ च्या निवडणुकीत विरोधकासाठी तगडा उमेदवार म्हणून प्रकाश पाटील यांना संधी दिली. कारखान्याची सत्ता गेल्याने राजकीय अस्तित्वासाठी आसुसलेल्या बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) निवडणूक रिंगणात उतरले. प्रकाश पाटील यांच्या गटात कुरघोडीचं राजकारण होत असताना, प्रचाराची ‘एकट्याने’ धुरा सांभाळत विजयाचा गुलाल कपाळी माखला. चुरशीच्या लढतीत बाबासाहेब पाटील यांचा २८३ मताने पराभव झाला. तो पराभव राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता.मतदारसंघात घेत विद्यमान जि. प. सदस्य प्रकाश पाटील (पोर्लेकर) यांनी कोटींची विकासकामे केली आहेत. त्यांच्या भावजय समृद्धी पाटील यांच्या नावावर जनसुराज्य पक्षाकडून शिक्कामोर्तब झाला आहे. जिल्हा बँकेत संचालकपदामुळे गटाला उभारी मिळाल्याने, मागील पराभवाची उतराई करण्यासाठी बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) आपल्या सौभाग्यवती उषा पाटील यांच्या माध्यमातून राजकीय नशीब आजमावणार आहेत, तर भाजपच्या प्रमुख नेत्यांशी सलगी व सच्चा कार्यकर्ता हेमंत भोरे (जोतिबा) आपलीर् पत्नी मेघा यांना भाजपकडून निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी कामालासुद्धा लागले आहेत. या निवडणुकीत महिला ओबीसी आरक्षणामुळे दोन्ही पाटील नेत्यांची उमेदवारी नसली तरी नात्यागोत्यातील उमेदवारीमुळे ‘त्या’ दोघांच्या राजकीय अस्तित्वाची व प्रतिष्ठा पणाला लागणार आहे, तर भाजपमुळे लढत रंगतदार होणार आहे. पोर्ले तर्फ ठाणे पंचायत समिती खुला प्रवर्ग झाल्याने अनेक कार्यकर्त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली होती; परंतु गटनेतेच जिल्हा परिषद लढण्यासाठी हौशी असल्याने गटातील कार्यकर्त्यांची पंचायत समितीच्या तिकिटासाठी चांगलीच गोची झाली आहे. वाडी रत्नागिरी पंचायत समिती गण जनसुराज्यचा बालेकिल्ला मानला जातो. माजी सभापती विष्णूपंत दादर्णे यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. यावेळी ओबीसी पुरुष आरक्षण असल्याने ‘जनसुराज्य’मधून त्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. गत निवडणुकीत काँग्रेसने डावलल्याने अपक्ष लढणारे शिवाजी सांगळे राष्ट्रवादीकडून पूर्ण तयारीनिशी उतरणार आहेत. या मतदारसंघात शेतकरी स्वाभिमानी संघटना व भाजप पक्ष स्वबळावर लढत असल्याने त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.इच्छुक उमेदवारपोर्ले तर्फ ठाणे जिल्हा परिषद : समृद्धी सचिन पाटील, पोर्ले/ठाणे (जनसुराज्य), उषा बाबासाहेब पाटील, आसुर्ले (राष्ट्रवादी), मेघा हेमंत भोरे, वाडी रत्नागिरी (भाजप)पोर्ले तर्फ ठाणे पंचायत समिती : राष्ट्रवादीतून अरुण पाटील, सर्जेराव सासने, अर्जुन चौगुले, (पोर्ले), जनसुराज्यमधून युवा नेते शहाजी खुडे, गणपती चेचर (पोर्ले), पृथ्वीराज सरनोबत, विजय सरनोबत (आसुर्ले), संजय पोवार (धबधबेवाडी), शे. स्वाभिमानीतून रामराव चेचर (पोर्ले), शंकर पाटील (आसुर्ले), भाजपतून शोक्त आगा, (दरेवाडी), तर झेंडा कुणाचा पण मिळू दे. निवडणूक लढवायचीचं असा सुरेश चौगुले यांनी चंग बांधला आहे.वाडी रत्नागिरी पंचायत समिती : जनसुराज्यमधून विष्णूपंत दादर्णे, सुनील नवाळे (जोतिबा), अनिल कुंदलकर (वेकंटवाडी), राष्ट्रवादीतून शिवाजी सांगळे (जोतिबा), विश्वास पाटील (आपटी), संतोष धुमाळ (बांबरवाडी), निवास ढोले (पोहाळे/आळते), शे. स्वाभिमानीतून राजेंद्र जाधव (आंबवडे), दगडू पाटील (नेबापूर), भाजपातून सचिन शिपुगडे, (बांबरवाडी).
पोर्लेत दोन पाटलांत अस्तित्वाची लढाई
By admin | Published: January 10, 2017 11:22 PM