लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणूक कार्यक्रमास सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी मंगळवारी मान्यता दिली. उद्या, गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. माघारीची मुदत २० एप्रिलपर्यंत असून, २ मे रोजी मतदान, तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने हालचाली गतिमान झाल्या आहेत. आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्तारूढ आघाडी, तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडी यांच्यात सरळ लढत होणार आहे. विरोधी आघाडीने जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह जनसुराज्यच्या नेत्यांना एकत्रित करत सत्तारूढ गटाला तगडे आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.
करवीर प्रातांधिकारी कार्यालयात उद्यापासून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून, ५ एप्रिलला सकाळी अकरा वाजता अर्जांची छाननी होऊन ६ एप्रिलला पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ६ ते २० एप्रिल दरम्यान अर्ज माघारीची मुदत असून, २२ एप्रिलला सकाळी अकरा वाजता चिन्हासह उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. २ मे रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान, तर ४ मे रोजी सकाळी आठ पासून मतमोजणी होणार आहे.
असा राहणार निवडणूक कार्यक्रम-
उमेदवार अर्ज दाखल करणे - २५ मार्च ते १ एप्रिल
उमेदवारी अर्जांची छाननी - ५ एप्रिल
पात्र उमेदवारांची यादी - ६ एप्रिल
अर्ज माघारीची अंतिम मुदत - २० एप्रिल
उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हे वाटप - २२ एप्रिल
मतदान - २ मे
मतमोजणी - ४ मे
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष
‘गोकुळ’ची निवडणूक स्थगित करावी, यासाठी सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली नाही. या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.