लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ वाचविण्यासाठी गेली नऊ वर्षे शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले. आता संधी द्यायच्या वेळेला ठरावांचे गणित पाहणार असाल तर आम्हांला लढाई नवीन नाही. आमच्यासाठी पर्याय खुले असल्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत ‘शेकाप’ला एक जागा देण्याबाबत विरोधी शाहू आघाडीकडून कोणतेच संकेत मिळत नसल्याने अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी ‘शेकाप’च्या शहर कार्यालयात ठरावधारकांची बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार होते.
संग्राम पाटील (म्हाळुंगे) म्हणाले, ‘गोकुळ बचाव’चा उगम ‘शेकाप’मुळे झाला. संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रस्थापितांना उघड विरोध केला. त्यामुळे आमचा उमेदवारीवर हक्क राहतो. ‘भोगावती’चे माजी उपाध्यक्ष केरबा पाटील म्हणाले, शाहू आघाडीने आमचा विचार केलाच पाहिजे, अन्यथा आम्हाला इतर पर्याय खुले आहेत, तरीही नेतृत्व जो निर्णय घेईल, त्यासोबत आपण राहू.
संपतराव पवार म्हणाले, दूध शॉपीतील अपहारापासून ‘गोकुळ’मधील अपप्रवृत्तींविरोधात आम्ही लढा दिल्याने उमेदवारीची अपेक्षा करणे गैर काय? आम्हाला सत्तेसाठी पद नको, त्यातून सामान्य माणसाला न्याय देण्याची आमची भूमिका आहे. तीच भूमिका शाहू आघाडीच्या नेत्यांची असल्याने ते जरूर विचार करतील.
अशोकराव पवार, भोगावती शिक्षण मंडळाचे सदस्य सरदार पाटील, एकनाथ पाटील (कंथेवाडी), सचिन पाटील (हळदी), अंबाजी पाटील (येळवडे), दत्ता पाटील, पी. एस. पाटील, अमित कांबळे, संजय डकरे, तानाजी पाटील, शामराव पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले.
...तर उत्पादकांसमोर एकटे जाऊ
नऊ वर्षे पशुखाद्य दरवाढ, वासाचे दूध आणि मल्टिस्टेट विरोधात लढाई यांत ‘शेकाप’ आघाडीवर राहिला. प्रसंगी ‘गोकुळ’वर जनावरांचा मोर्चा काढून कारभाऱ्यांना सळो की पळो करून सोडले. आता शाहू आघाडीतून उमेदवारी मिळणे हा आमचा हक्क आहे. तरीही डावलणार असाल तर आम्हांला लढाई नवीन नाही, दूध उत्पादकांसमोर एकटे जाऊ, अशी भूमिका काही ठरावधारकांनी मांडली.
महादेवराव महाडिक यांची ऑफर
दोन दिवसांपूर्वी महादेवराव महाडिक यांनी फोन करून सत्तारूढ गटासोबत रहा, आपणाला योग्य संधी देऊ, असे सांगितले होते. यावर, सामान्य दूध उत्पादकांचे प्रश्न घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलो, त्यावेळी प्रश्न सोडवण्याऐवजी तुम्ही अडचणीतच आणण्याचा प्रयत्न केला. आमच्या विचाराची दिशा ठरलेली आहे, त्यानुसारच पुढे जाऊ, असे आपण महाडिक यांना सांगितल्याचा गौप्यस्फोट पवार यांनी केला.
सोमवारी निर्णय जाहीर करणार
विरोधी आघाडी आपणास उमेदवारी देईल, याबाबत आपण आशावादी आहोत. सोमवारी (दि. १९) पर्यंत आपण वाट पाहूया. त्यानंतर पुढील दिशा ठरवूया, असे संपतराव पवार यांनी सांगितले.