कोल्हापूर : महाराष्ट्राचा इतिहास पानिपतच्या लढाईचा उल्लेख झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. एकाच दिवसात नर आणि पशूसंहार झालेले हे जगातील सर्वांत मोठे युद्ध होते. या लढाईत मराठ्यांची हार झाली असली, तरी त्यांनी गाजवलेले शौर्य कालातीत आहे. विजयाची हार गळ्यात पडण्याआधी त्यांनी मान टाकली. हा इतिहास नव्या पिढीला कळावा, यासाठी मंगळवार, दि. ७ जानेवारीपासून काढण्यात येणाऱ्या पानिपत शौर्य यात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी केले.पानिपत येथील युद्धामध्ये धारातीर्थी पडलेल्या शूरवीरांना वंदन करण्यासाठी कोल्हापुरातून ७ ते १४ जानेवारी दरम्यान पानिपत शौर्ययात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत युद्धावेळी ज्या ज्या मार्गाने मराठे गेले होते, जेथे त्यांचे पडाव पडले होते, त्या उदगीर, परतूर, बुऱ्हाणपूर, देवास, गुना, ग्वाल्हेर, कुरुक्षेत्र येथे छावणीस थांबून तेथील इतिहास समजून घेतला जाणार आहे. ही शौर्ययात्रा १४ तारखेला पानिपत येथे पोहोचेल.पानिपतच्या इतिहासाबद्दल पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर ज्याची छाती भरून येत नाही आणि पानिपतचे नाव घेतल्यावर ज्याच्या डोळ्यांत पाणी येत नाही, तो मराठी माणूस नाही. मराठ्यांचे सर्वश्रेष्ठ गुण आणि दुर्गूण सांगणारी ही लढाई आहे. दुर्दैवाने तीन दिवसांपासून उपाशीपोटी लढत असलेले सैनिक तीव्र सूर्यकिरणे सहन करू शकले नाहीत. अखेर एक लाख सैनिक शत्रूशी लढता लढता मेले. भाऊसाहेबांच्या मदतीला निघालेल्या पेशव्यांनी ख्याली खुशाली आणि रंगबाजीत वेळ घालविला नसता, तर कदाचित मराठे ही लढाई जिंकले असते.इंद्रजित नागेशकर म्हणाले, विठ्ठलाच्या ओढीने ज्याप्रमाणे वारी निघते त्याचप्रमाणे संक्रांतीच्या कालावधीत पानिपतचे शौर्य अनुभवण्यासाठी तरुणाईने या मोहिमेत सहभागी व्हावे. इतिहासाला उजाळा देणाºया स्थळाला पर्यटनाचे स्वरूप यावे, अशी आमची इच्छा आहे. सोलापूर, औरंगाबाद, लातूर, उदगीर, परतूर या ठिकाणाच्या विविध संघटना व स्थानिक लोकांनी यात्रेच्या स्वागतासाठी तयारी सुरू केली आहे.नाव नोंदणीसाठी ग्रॅव्हिटी, आॅफिस नं. ४, पहिला मजला, स्टार टॉवर, पाच बंगला शाहूपुरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेस विश्वजित जाधव, पवन जामदार, राहुल मगदूम, विवेक मंद्रुपकर उपस्थित होते.