इचलकरंजी : नगरपालिकेचा कारभार म्हणजे पाच पक्षांची आघाडी असल्याने घटक पक्षांशी तो समन्वयाने चालविला पाहिजे, असे सरळ सूत्र असताना पालिकेत आता तत्त्व-विचारांऐवजी हातघाई सुरू झाली आहे. विकास-राजकारण याऐवजी अर्थकारणाची लढाई सुरू झाल्याने आता आघाडीच्या नेतृत्वाने आत्मकेंद्रित होऊन समन्वय साधण्याची कवायत चालू केली पाहिजे, अशी मागणी जाणकार नागरिकांतून होत आहे.नगरपालिका म्हणजे शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यापासून आरोग्य, स्वच्छता, दिवाबत्ती, रस्ते, आदी मूलभूत सेवा-सुविधा देणारी स्वायत्त संस्था आहे. तसेच अनेक विकासात्मक व विधायक कामेही नगरपालिकेच्या माध्यमातून राबविली जातात. पालिकेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी अनेक पक्षाचे, भिन्न विचारांचे असले तरी त्यांनी एक विचाराने सेवा-सुविधा पुरवाव्यात आणि विकासकामे करावीत, असा सरळ अर्थ आहे. त्यावेळी त्यांच्या पक्षाचे अस्तित्व जाणविण्याइतके राजकारण असावे. मात्र, त्याचा अतिरेक नसावा, ही अपेक्षा असते.सन २०१६ मधील नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपचे १६, राष्ट्रीय कॉँग्रेसचे १८, राजर्षी शाहू आघाडीचे ११, ताराराणी आघाडीचे १० आणि राष्टÑवादी कॉँग्रसचे ७ नगरसेवक निवडून आले. त्यापैकी भाजप, ताराराणी आघाडी व राष्टÑवादी कॉँग्रेस यांची आघाडी होऊन ती सत्तेवर आली आणि राष्टÑीय कॉँग्रेस व शाहू आघाडी यांची आघाडी विरोधात राहिली.साधारणत: सव्वा वर्षांनंतर नगरपालिकेमध्ये अनेक गंभीर प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत. त्यामध्ये वारणा नळ योजना, कृष्णा नळ पाणी योजनेची दाबनलिका बदलणे, भुयारी गटार योजना, आयजीएम हॉस्पिटल, रस्त्यांचे डांबरीकरण यांचा समावेश आहे. या सेवा-सुविधा पुरविण्यासाठी किंवा विकासकामांसाठी नगरपालिकेमधील सर्वच पक्ष-आघाड्यांमध्ये चर्चा होऊन सुसूत्रता येणे आवश्यक आहे. सत्तारूढ आघाडीमध्ये समन्वयाने हे प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन केले पाहिजे. मात्र, त्याचा अभाव दिसून येतो.अलीकडे सत्तारूढ आघाडीत अनेक प्रश्न व समस्यांवर मतभेद दिसून येतात. त्यातूनच वादही निर्माण होतात. अशावेळी पक्षनेतृत्वाने याकडे गांभीर्याने पाहून समन्वय साधण्यासाठी नगरसेवक आणि कारभाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यामध्ये योग्य ती दिशा ठरविणे आवश्यक आहे; पण याचा अभाव असल्यामुळे मंगळवारी (दि. १०) नगरपालिकेमध्ये ज्येष्ठ नगरसेवक व नगराध्यक्षांचे स्वीय सहायक यांच्यात मुद्द्यावरून गुद्द्यांची लढाई झाली. ज्यामुळे नगरपालिकेची वाईट प्रतिमा तयार झाली.वर्षातून एकवेळच पक्षनेतृत्वाकडून दखलनगरपालिकेमध्ये असलेल्या सत्तारूढ व विरोधी आघाड्यांमध्ये वर्षातून एकवेळ येणाºया विविध विषय समित्यांच्या वाटपासाठी पक्षनेतृत्वाकडून बैठक घेतली जाते. त्यावेळी घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये असलेले मतभेद मिटविले जातात. त्यानंतर वर्षभर पक्षनेतृत्व नगरपालिकेच्या कारभाराकडे दुर्लक्षच करते. यामुळेच आता तत्त्व, वैचारिकता यांची लढाई संपून निव्वळ अर्थकारणापोटी राजकारण करण्याची प्रथा नगरपालिकेमध्ये येऊ लागली आहे. त्याचा दोन्हीकडील पक्षनेतृत्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
मुद्द्यांची लढाई आली गुद्द्यावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:19 AM