कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले होते. यानंतर आज, मंगळवार या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळपासून नागरिकांनी मतदानासाठी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. काही मतदानकेंद्रावर किरकोळ कारणावरुन वादावादीचे प्रकार देखील घडले.मंगळवार पेठ परिसरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आले असता आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचाही प्रकार घडला. तर दुसरीकडे कसबा बाबडा परिसरातील मतदान केंद्रावर चक्क चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांची गळाभेट घेतली. प्रचारादरम्यान वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप झाले होते. मात्र राजकारणात कोणी कोणाचे शत्रू नसते म्हणतात ना याचीच प्रचिती या भेटीवरुन आली.सकाळच्या सुमारास चंद्रकांत पाटील यांनी कसबा बाबडा परिसरातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. दरम्यान राजर्षी शाहू विद्यालयात चंद्रकांत पाटील आले असता याठिकाणी आमदार ऋतुराज पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी चंद्रकांतदादांनी ऋतुराजची गळाभेट घेतली. यावेळी उपस्थित कार्यकर्ते अचंबित झाले. या भेटीदरम्यान चंद्रकांतदादा ऋतुराज पाटलांना म्हणाले मी घरीच येणार होतो.आज, पालकमंत्री सतेज पाटील यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चंद्रकांतदादा सतेज पाटलांच्या घरी जाणार होते. मात्र मतदानाचा दिवस असल्याने तुम्ही घरी नसणार म्हणून घरी आलो नसल्याचे चंद्रकांत पाटलांनी ऋतुराज यांना सांगितले.
कोल्हापूर उत्तर'चे रणांगण: चंद्रकांत पाटलांनी घेतली ऋतुराज पाटलांची गळाभेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 1:54 PM