कोल्हापूर : पूर ओसरल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत ३६३ गावांमधील ६८१ पाणी नमुने तपासण्यात आले असून, त्यांपैकी ८४ ठिकाणचे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. सात प्रयोगशाळांमध्ये हे पाण्याचे नमुने तपासण्याचे काम अथकपणे सुरू आहे.जिल्ह्यातील ३६३ गावे ही पुरामुळे बाधित झाली असून, या अनेक गावांमधील पाणी योजना पाण्यात गेल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांमधील पाणीपुरवठा बंद झाला होता. एकीकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून योजना सुरू करण्यात येत असताना, मूळ स्रोतांतील पाणी पिण्यायोग्य आहे का, याची खात्री झाल्याशिवाय गावात पाणीपुरवठा करू नये, अशा सक्त सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार या सर्व गावांमधून १४ आॅगस्टपासून पाणी उतरेल तसे पाण्याचे नमुने तपासण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ६८१ नमुने तपासल्यानंतर त्यामधील ८४ नमुने अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी पाणी शुद्धिकरणासाठीची प्रक्रिया आणखी सुरू करण्यात आली असून, त्यानंतर पुन्हा नमुने तपासले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी दिली.गडहिंग्लज, कोडोली, शिरोळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यालय, सोळांकूर या पाच प्रयोगशाळांव्यतिरिक्त मुख्यालयात पुण्याहून एक टीम आली असून, या सात प्रयोगशाळांच्या माध्यमातून हे नमुने तपासले जात आहेत. शुद्ध पाण्याचे महत्त्व ओळखलेले ग्रामस्थही अशुद्ध पाणी पिणे टाळत असून, अनेक गावांमध्ये बसवण्यात आलेल्या खासगी शुद्धिकरण प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभागामार्फत बसविण्यात आलेल्या ४० गावांमध्येही शुद्धिकरण प्रकल्पांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असल्याचे जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाचे उपअभियंता उत्तम थोरात यांनी सांगितले.
अयोग्य पाण्याच्या ठिकाणी फलक लावण्याच्या सूचनाज्या गावातील ज्या स्रोतातील पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे, तेथे ‘हे पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे’ असे फलक लावण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी ही माहिती दिली.