शाहूवाडी तालुक्यातील बॉक्साइट उत्खनन व केलेला बॉक्साईटचा साठा हा शासनाच्या नियमांचे पालन करूनच त्याबरोबरच पर्यावरणाचे रक्षण करून साठा केलेला आहे. याबद्दल आपणास बहुजन परिवर्तन पार्टीकडून चुकीची माहिती दिली जात आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. याची आपण योग्य चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन शाहूवाडी तालुका पंचक्रोशी मोटार मालक वाहतूकदार संघाच्या वतीने तहसीलदार गुरु बिराजदार यांना देण्यात आले आहे .
निवेदनात म्हटले आहे की, बहुजन परिवर्तन पार्टीकडून आपणास दिशाभूल करून बॉक्साइट उत्खनन व साठा केलेले ठिकाण याबद्दल चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे. या व्यवसायावर तालुक्यातील ट्रक चालक, मालक व इतर आधारित व्यवसाय, कामगार अवलंबून आहेत.त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. जर त्यांनी दिलेल्या माहितीवरून बॉक्साईट वाहतूक बंद करण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न झाल्यास तालुक्यातील सर्व ट्रक चालक-मालक व संघटना आपल्या वाहनांसह तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करतील असा इशाराही शाहूवाडी तालुका पंचक्रोशी मोटार मालक वाहतूकदार संघाच्या वतीने दिला आहे. निवेदनावर अध्यक्ष युवराज पाटील, उपाध्यक्ष माधव कळंत्रे, माजी नगरसेवक विनायक कुंभार,संतोष गांधी, सुभाष पवार, बाबासोा पाटील यांच्या सह्या आहेत.