कसबा बावडा : कसबा बावडा पॅव्हेलियन निवडणूक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १ ते ११ मधील बावडा, लाईन बझार, कदमवाडी आणि सदर बाजार परिसरातील ४८ मतदान केंद्रांवर सरासरी ६८.७१ टक्के मतदान झाले. ५७ हजार ५०५ मतदारांपैकी एकूण ३९ हजार ५०९ इतक्या मतदारांनी आपला हक्क बजावला. भोसलेवाडी-कदमवाडी प्रभागात सर्वाधिक ७७.३३ टक्के मतदान झाले, तर सर्वांत कमी मतदान ताराबाई पार्क प्रभागात ५५ टक्के इतके झाले. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कदमवाडी, भोसलेवाडी, शाहू कॉलेज, सदर बाजार, आदी परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याउलट नागाळा पार्क, सर्किट हाऊस, ताराबाई पार्क, आदी उच्चभ्रू वस्तीच्या भागात शांतता दिसत होती. सतेज पाटील यांच्या बालेकिल्ल्यात सरासरी ७१ टक्के मतदान झाले. याठिकाणी पाटील यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी महाडिक गटाने जोरदार यंत्रणा लावली होती. यामुळे शुगरमिल व कसबा बावडा पूर्व या भागात दोन्ही गटांचे कार्यकर्ते आपले मतदान करून घेण्यासाठी अखेरपर्यंत धडपडताना दिसत होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकगठ्ठा मतदार मतदानासाठी बाहेर पडल्यामुळे महाराष्ट्र विद्यालयातील मतदान केंद्रे गर्दीने फुलून गेली होती. उशिरापर्यंत मतदान प्रभाग क्रमांक १० - शाहू कॉलेजमध्ये सायंकाळी साडेचार-पाचच्या सुमारास मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी रांगेत आल्याने मतदान प्रक्रिया संपण्याच्या सायंकाळी साडेपाचच्या वेळेनंतर रांगेतील मतदारांना चिठ्ठ्या देऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यामुळे येथील मतदान सायंकाळी सातपर्यंत सुरू होते.
बावडा-कदमवाडीत ६८.७१ टक्के
By admin | Published: November 02, 2015 12:46 AM